नेहमी वाटतं, ज्यांच्यामध्ये काही ना काही कला असते ते लोक किती नशीबवान असतात. स्वत:च्या दु:खाला त्यांना वाट मोकळी करून देता येते, आनंद साजरा करता येतो. कोणी दर्दभऱ्या आवाजात गाऊ शकतो तर कोणी त्या दु:खाला कॅनव्हासवर उतरवून आणतो, कोणी श्रेष्ठ साहित्यकृती जन्माला घालतो तर कोणी एखादी सुरावट रचतो. पण माझ्यासारख्या सामान्य लोकांनी काय करावं?
ना मी गायक, ना कवी, ना चित्रकार, ना कथाकार, ना कीर्तनकार! कोणतीच कला अवगत नसेल तर व्यक्त व्हावं कसं? अस्वस्थतेला बाहेर काढावं कसं? असा खूप प्रश्न पडायचा आणि एक दिवस किशोर, जगजीत ऐकता ऐकता आपसूकच उत्तर सापडलं, हे लोक व्यक्त झाले आहेत ते आपल्यासाठीच तर झाले आहेत.
आपल्याला कलेतून व्यक्त होता येत नाही तर त्यांची कला फक्त अनुभवावी! जितकं ऐकता येईल तितकं ऐकावं, जितकं वाचता येईल तितकं वाचावं, जितकं रसग्रहण करता येईल तितकं करावं प्रत्येक गोष्टीचं, आनंदातही अन दुःखातही! कुठेना कुठे संदर्भ जुळत जातात आणि समाधान; शांतता मिळत जाते.
कला म्हणजे देवत्वाचा अंशच! तो सगळ्यांनाच कसा मिळेल? भले देवाने आपल्याला कोणती कला दिली नसेल पण रसिकता तर दिलीये ना? प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेता येते त्याबद्दलच तुझे आभार देवा, ज्यांना तू हेही दिलं नाहीस त्यांनी काय करावं?