Wednesday 25 January 2017

कबुली

आधी ठरवलं होतं की समजा आपण ब्लॉग वगैरे तयार केला तर त्यावर रोज लिहियचं.
पण खरंच निवांत वेळ मिळाल्याशिवाय काही लिहिणं किती अवघड आहे हे चार दिवसातच समजलं.
इतके दिवस मी चांगले ब्लॉग्स नुसतेच वाचत होते आणि मनात यायचं हे लोक इतकं छान लिहू शकतात तर वारंवार का लिहीत नसावेत?
कोणाच्या ब्लॉगवर पूर्वी दर आठवड्याला अपडेट्स असायचे ते कोणाचे महिन्यावर तर कोणाचे वर्षावर गेलेले.
कोणाचा ब्लॉग २ वर्षांपूर्वी बंद पडलेला तर कोणाचा चार!
पण आता त्याचं उत्तर मिळालंय.
मला सहजच लिहायचं असूनही निवांत बसल्याशिवाय लिहावंसं वाटत नाही तर छान लिहिणाऱ्यांना तर अजून वातावरण निर्मिती लागत असेल ना!
डोक्यात दुसरेच काही विचार चालले असतील किंवा काही डेडलाईन असेल तर खरंच नाही जमत बुवा लिहायला.
आपली प्रांजळ कबुली!
आणि हो छान छान लिहिणाऱ्यांनी नक्की वेळात वेळ काढत जा!

Monday 23 January 2017

उपमा

एखाद्या गोष्टीला उपमा कशी देऊ नये हे कोणी श्रे कडूनच शिकावं!
काल मला म्हणाला, तुझी स्किन आज खूपच छान दिसतेय.
नवऱ्याने रंगरूपाची स्तुती केलेली कोणाला नाही आवडणार.
मीही एकदम खुश झाले.
थोडीशी लाजायला पण सुरुवात झाली होती.
तोही माझ्या चेहऱ्याकडेच पाहत होता.
मी अजूनच लाल झाले.
त्याने माझा चेहरा हातात घेतला.
तेवढ्यात हे पुढचं वाक्य बोलायची खरंच काही गरज होती का?
"अगदी गुळगुळीत दाढी केल्यावर दिसते ना तशी..."
@#$%^&

Friday 20 January 2017

निरंजन

इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन झाल्यानंतर घराला हातभार म्हणून एके ठिकाणी डेटाएंट्रीचं काम करत होते. छोटा ३BHK फ्लॅटच होता तो. माझा टायपिंग वगैरे काही कोर्स झाला नव्हता, पण घरासाठी इन्कम महत्त्वाचं होतं, त्यामुळे खोटंच सांगितलं की माझा ४० चा स्पीड आहे म्हणून. त्यांनी टेस्ट घेतली, पण बऱ्यापैकी फास्ट टाईप करू शकत असल्याने त्यांनी मला रुजू करून घेतलं. तिथे मी जॉईन झाल्याझाल्या आधी सुपरवाईझरच्या रूम मध्येच बसत असे. मी व्यवस्थित काम करतेय आणि सिन्सिअर आहे असं लक्षात आल्यावर माझी रवानगी दुसऱ्या रूममध्ये झाली. तिथे निरंजन पहिल्यांदा भेटला.

ज्या वेगळ्या रूममध्ये मला बसवलं होतं तिथे निरंजन आणि मी दोघेच बसायचो. याआधी मी कधी मुलांशी स्वतःहुन बोलले नव्हते. निरंजनशीदेखील नाही बोलले. मी आपली माझी रोजच्या गबाळ्या अवतारात येई, रेडिओ चालू असे, तो ऐकत ऐकत कीबोर्ड बडवत बसे. तो शेजारी आधी एकटाच काहीतरी बडबड बडबड करायचा, नंतर हळूहळू माझ्याशी बोलू लागला. अगदी चुणचुणीत होता तो. नंतर दिवसातून २-४ वाक्यांवरून गाडी कधी तासंतास गप्पांपर्यंत आली कळलंच नाही. मला नेहमी ओरडायचा की तू जास्त टार्गेट करून देतेस त्यामुळे इतरांनाही तेवढं काम करावं लागतंय, एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस. तो गप्पांमध्ये बोलता बोलता त्याला कशी जोडीदार हवी हे सांगायचा, त्यातलं बरंच वर्णन माझ्याशी जुळायचं. मी घरीही आईला सांगितलं होतंच त्याच्याबद्दल, म्हणजे माझ्या ऑफिसच्या गप्पांमध्ये त्याचं नाव असायचं.

खरंतर माझ्याशी कोणीतरी मुलगा स्वतःहुन बोलतोय ही भावनाच खूप सुखद होती. मी तेव्हा असेन वीसेक वर्षांची. दिसायला अजून बरी होते. तर हा निरंजन सोलापूर तालुक्यातल्या छोट्याशा गावातून आलेला मुलगा. शिक्षण मध्येच सोडलेलं पण हार्डवेअर चा कोर्स केलेला. पुण्यात एका आश्रमात राहत होता. अध्यात्माची त्याला आवड होती. निदान माझ्याशी बोलताना तरी तसं दाखवायचा. त्यांच्या आश्रमात कीर्तनादी कार्यक्रम चालायचे त्यातही भाग घ्यायचा. त्याने त्या आश्रमाच्या गुरूंची २-३ पुस्तकेही मला वाचायला दिली होती. आणि एव्हाना आमची चांगली मैत्री झाली होती. मी कविता करते, वहीवर सहज काही परिच्छेद खरडते हे आतापर्यंत त्याला समजलं होतं. आणि मीही निरंजनला वही वाचायला द्यायची म्हणून अजून हुरूप येऊन वहीत पुढची पानं पांढऱ्याची काळी करू लागले होते. आणि माझी वही आतापर्यंत त्याच्याकडे पोचलेली होती. 

ऑफिसमध्ये इतर मैत्रिणीदेखील होत्या, त्यात प्रीतमदेखील होती. ती स्वतः:च जरा ओव्हरच होती. एकदा निरंजन बाईक घेऊन आला आणि मला थोड्या अंतरावर सोडतो म्हणाला. मला काही वावगं वाटलं नाही. प्रीतमने मला त्याच्या बाईकवर पाहिलं, आणि दुसऱ्या दिवशी मला समजावून सांगू लागली की तो काही बरा मुलगा नाही. दारू पितो वगैरे. तसा तो बोलता बोलता म्हणायचा आज आम्ही मित्र बसणार, फुल कल्ला वगैरे, म्हणजे माझ्याशी नाही, पण ग्रुपमध्ये असलं बोलायचा, तर मला वाटायचं की तो मजेतच बोलतोय. आश्रमात राहणारा, घरच्यांचे संस्कार असलेला, जानवं घालणारा मुलगा नसेलच दारू पीत.

प्रीतम सांगत होती की तिच्याशीही तो खूप बोलायला जायचा, पण तिने कधी त्याला भाव दिला नव्हता. कारण तो कसा फालतू आहे हे तिला माहिती होतं, आणि याउलट प्रीतमची शाळेपासून बरोबरची मैत्रीण मला सांगायची प्रीतमच कशी फालतू आहे. तिची कशी आतापर्यंत ३-४ लफडी झालेली आहेत, घरी कशी सारखी बोलणी खाते. पण शिव्या मात्र होत्या त्याच्या तोंडी. एकदा सीपीयू मध्ये हात अडकल्यावर आईचा घो म्हणाला होता, आणि नंतर हाच शब्द काही वेळा ऐकला होता त्याच्या तोंडून. मला तर काही कळेनासंच झालं होतं. पण ही गुंतागुंत फार वाढली नाही.

एके दिवशी आम्ही सकाळी नेहमीच्या वेळेत ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसचं दार बंद दिसलं. खाली रखवालदाराला विचारलं, त्याने उद्या या म्हणून सांगितलं. असे ४-५ हेलपाटे झाले, तेव्हा एकदा ऑफिस उघडं दिसलं. आमचे २-३ महिन्यांचे पगार थकलेले होते. त्यातला एका महिन्याचा पगार आम्हाला त्या दिवशी मिळाला आणि कंपनी बंद पडलीये असं आम्हाला सांगण्यात आलं. उरलेला पगार बुडालाच. "एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस" आठवलं मला. आमचा संपर्क कमी झाला. तेव्हा आमच्याकडे मोबाईल्स नसल्याने माझाही त्याच्याकडे लँडलाईन नंबर होता आणि त्याचाही माझ्याकडे लँडलाईनच होता आश्रमाचा!

नंतर इंजिनिअरिंगचा निकाल लागून मला हवी तशी नोकरी मिळाली, आता असे टाईमपास जॉब्स करायची मला गरज नव्हती. निरंजनचा तर मला जवळजवळ विसरच पडला होता, आणि काही वर्षांनी एके दिवशी अचानक तो कुठून तरी सोशल साईटवर अवतरला, म्हणाला माझी वही त्याच्याकडे आहे ती त्याला परत करायचीये. आता आमच्याकडे मोबाईल्स होते. तो सारखं भेटण्याबद्दल बोलत होता आणि मी सारखं त्याला टाळत होते. आणि आतापर्यंत मी मुलांना ओळखू लागले होते. त्याला मला कशासाठी एकदा तरी भेटायचंय ते माहिती होतं मला. कदाचित त्याच्या घरी लग्नाचं बघत होते.

आता मी तेव्हा होते तशी नव्हते दिसत. कष्ट करून करून शरीर सुकलेलं होतं. चेहरा निस्तेज झाला होता, आणि आता मी त्याला आवडणार नाही याची खात्री होती, म्हणूनच मी ते टाळत होते. पण हे किती दिवस चालणार? एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू म्हटलं. ऑफिसमधून सुटून एके संध्याकाळी भेटले त्याला. माझी वही घेऊन आला होता तो. माझ्याकडे पाहिलं आणि ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस म्हणून खूप हळहळ व्यक्त केली. खरोखरच काळजीच्या स्वरात काळजी घे म्हणाला आणि वही देऊन निघून गेला. आता त्याचे फोन मेसेज काही येणार नाही हे माहिती होतं मला!

Wednesday 18 January 2017

न्यूनगंड

घरी आम्ही तिघी बहिणीच! लहान होते तेव्हा आईशी बोलताना जुजबी विचारपूस झाली की बऱ्याच बायका म्हणायच्या, मुलगा नाही तुम्हांला? अरेरे! आई त्यांना म्हणायची मला आजिबात वाईट वाटत नाही, माझ्या मुली मला मुलासारख्याच आहेत. तेव्हा आईचा अभिमान वाटायचा. आजी-आजोबा देखील नातू आणि नातींमध्ये भेदभाव करायचे नाहीत. शाळेतही शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये भेदभाव झाल्याचं आठवत नाही. त्यामुळे शालेय जीवन चालू होतं तोपर्यंत सगळं छान चाललं होतं. पहिल्या नंबरात नसले तरी थोडीफार बुद्धिमत्ता असल्याने अभ्यास, शाळा आणि आपण असं छानसं जग होतं.

शाळेत हुशार इयत्तेत असल्याने आमच्या वर्गात फालतूपणा कमीच होता. तरी आठवी-नववी नंतर अमक्याने तिला प्रपोज केलं, तिने त्याची तक्रार शिक्षकांकडे केली अशा गोष्टी कानावर पडू लागल्या. हे सगळे अभ्यासात लक्ष नसणाऱ्यांचे धंदे आहेत अशीच धारणा होती. पण अशा गोष्टी ऐकायला एकीकडे मजाही यायची. मी तर लांब केस, तेल लावून घट्ट दोन वेण्या अशी टिपिकल नॉन-फॅशनेबल मुलगी होते, आणि तोपर्यंत त्यात काही चुकीचंही वाटत नव्हतं.

नंतर अकरावी-बारावीला कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्या रंगीबेरंगी मुली दिसू लागल्या. थोडा टीव्हीचा मनावर परिणाम होऊ लागला होता. छान-छान कपडे घातलेल्या स्टायलिश मुली पाहिल्या की थोडा हेवा वाटू लागला होता. आमची प्रगती फक्त दोन वेण्यांवरून एक वेणी आणि शाळेच्या ड्रेस ऐवजी तीन वेगवेगळे पंजाबी ड्रेस इतकीच झाली होती. अर्थात आपल्याला यापेक्षा जास्त काही परवडणारंही नाही याची जाणीव होतीच. त्यामुळे तेव्हाही फक्त अभ्यास एके अभ्यासच चालू होतं. नंतर एका हुशार मुलीच्या मागे एक मुलगा लागला होता आणि ती त्याच्याबद्दल बोलत होती तेव्हा जाणवलं की आपण कोणाला आवडू शकत नाही का? पण त्यावर फार विचार करावा असं तोपर्यंत तरी काही नव्हतं.

इंजिनिअरिंगला शहराबाहेर ऍडमिशन मिळाली आणि पहिल्यांदा मी घर सोडून राहणार होते. सुदैवाने सगळ्या रूममेट्स चांगल्या मिळाल्या. आणि गावाकडे असलो, तरी शहरातल्या राहणीमानाचा काही परिणामच झालेला नसल्याने काहीच अडचण आली नाही. पण मुंबईची आहे हे सांगितल्यावर सगळ्यांना थोडं आश्चर्य मात्र वाटायचं. आणि लोकल कितीतरी मुली माझ्यापेक्षा स्मार्ट राहायच्या. घरी केस कापू का अशी दोन-तीनदा विचारणा करून झालेली आतापर्यंत, पण आईच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत नव्हती. इथेही कॉलेजमध्ये मी एक थोडीफार हुशार मुलगी म्हणूनच ओळखली जाऊ लागले होते. पण थेअरीमध्ये जास्त गुण मिळूनही वायवाज ना कमी गुण मिळायचे, आणि जे थेअरीत जेमतेम पास व्हायचे अशा लोकल आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना वायवा मध्ये पैकीच्या पैकी गुण असायचे. तेव्हा लक्षात नव्हतंच आलं हे, दुनियादारी थोडी समजायला लागली तेव्हा याही गोष्टी आठवल्या इतकंच!

कॉलेज पूर्ण केलं आणि डेव्हलपरचा जॉब मिळाला. नोकरीसाठी फार शोधाशोध करावी लागली नाही. नोकरीत स्वत:चं स्थान निर्माण करायलाही फार कष्ट पडले नाहीत. लाईफस्टाईल अजूनही होती तशीच होती. आधी अभ्यास हे एकमेव ध्येय होतं, आता पैसे कमावणे हे एकमेव ध्येय झालं. सुदैवाने ऑफिसमध्ये लाईफस्टाईल पेक्षा बुद्धिमत्तेची कदर करणारे सिनियर्स भेटल्याने काही अडचण आली नाही. हळूहळू पगार वाढत गेला. लग्नासाठी पुरेशी रक्कम जमा झाल्यावर मुलं बघायला सुरुवात केली, आणि सगळा प्रॉब्लेम सुरु झाला.

कितीही हुशार असली तरी हुशार न दिसणारी मुलगी कोणाला आवडेल? तेही आजकालच्या जमान्यात? बरीच मुलं मला पटायची नाहीत, आणि जी थोडीफार बरी वाटायची त्यांच्याकडून नकार यायचा. तसंही अगदीच काडीसारखा बांधा, उंची कमी, चेहऱ्यावर डाग, नाकीडोळीही साधारणच, एकही फीचर म्हणावं असं नाही, अशी मुलगी अरेंज मॅरेज मध्ये कोणाला आवडणार? थोड्याच दिवसात मुलं पाहणे हा फक्त सोपस्कार म्हणून उरला. मुलांना जेव्हा निर्णय घेण्यासाठी एकदा भेटून बोलायचं असतं, तेव्हा बोलायचं कमी आणि 'बघायचं' जास्त असतं. आणि मग सुरु झाला स्वत:बद्दल न्यूनगंड! एक स्त्री जशी असायला हवी तशी मी नाही याबद्दल प्रचंड न्यूनता!

Tuesday 17 January 2017

डेली सोप्स


मराठी डेली सोप्स वर बंदी आणावी असं का नाही वाटत कोणालाच?
कसलं लॉजिक सोडून दाखवतात सगळं.
हिंदीवाल्यांनी फार पूर्वीच लॉजिकशी फारकत घेतली, तेव्हा मराठीत थोडंफार बरं चाललं होतं, पिंपळपान, गंगाधर टिपरे वगैरे वगैरे.
पण हिंदीची नक्कल नाही केली तर आम्ही सृजनशील वगैरे नाही का म्हणवले जाणार? कशाला उगीच ते!

त्या म्हाळसा-बानू आणि देवांची कथा पार लव्हस्टोरी ट्रॅन्गल करून टाकलाय. त्या म्हाळसेला काही तिचं रहस्य समजायला तयार नाही, अरे हो समजलं तर मालिका नाही का संपून जायची!
तुझ्यात जीव मध्ये एक असुरी पात्र घुसडलंच आहे, आणि ती देखील स्त्रीच असायला हवी हा नियमही पाळलाय.

नवऱ्याची बायको तर खरंच एवढी बिनडोक आहे की तिची दयासुद्धा येत नाही. जरासुद्धा स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? तो नवरा एवढा हाडतूड करतोय आणि ही सगळं खापर त्या तिसऱ्याच पोरीवर फोडून मोकळी. तो गुरु काय तिसरीतला मुलगा आहे का त्याला कोणी फूस लावायला? त्याला धडा शिकवेन इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याकडे परत कशाला जायचंय हिला? आणि त्याला धडा शिकवण्याची तर कुठे बातच नाही, जी काही वाट लावणार ती त्या पोरीची लावणार आहे म्हणे!

खुलता कळी मध्ये तर रोज चोराच्या उलट्या बोंबाच पाहायला मिळतात. त्या मोनिकाने आक्रस्ताळेपणा सुरु केला की तिला कोणी झोपत का नाही, की तू लग्नाआधी शेण खाल्लंस म्हणून तुझ्यावर ही वेळ आलीये आणि आता ते भोग म्हणून? माझी आई तिची कोणीतरी पाहिजे होती. इथे आमची कितीवेळा काही चूक नसतानाही आम्हाला गप्प करते तर मोनिकाची काय हालत केली असती!

काही दिया परदेशी मध्येही सगळा आनंदी आनंदच आहे. कोणती सून निशाइतकी वाईट आणि सासू गौरीच्या आईइतकी चांगली असते का? चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टींचं टोकच दाखवतात अगदी! त्या गौरीची जाऊबाई जितकी माठ दाखवलीय तितकं खरंच कोणी असतं का? बाकी बनारसमधल्या घरगुती संस्कृतीबद्दल विशेष काही माहिती नाही, पण जितकं मालिकेत दाखवलंय तितकं जुनाट वातावरण अजूनही असेल का?

एवढं असूनही सासूबाई कशा रोज ७ ते ११ टीव्हीसमोर डिंक लावून चिटकल्यासारख्या बसतात याचंच आश्चर्य वाटतं. एखादा भाग बुडला तर दुसऱ्या दिवशी त्याचं रिपीट पाहतात म्हणजे पाहतातच! जणू काही त्यावर परीक्षाच द्यायचीये त्यांना! त्यांच्यामुळेच जेवण करताना आणि नंतरचं आवरताना या मालिका डोळ्यापुढून गेल्यात त्याचा मला इतका त्रास होतो तर लोकांमध्ये हे सगळं न चुकता पाहण्याचा पेशन्स कुठून येत असेल?
देवा, माझीही सहनशक्ती थोडी वाढव रे बाबा!

Monday 16 January 2017

तो


मी का हे लग्न करतेय?
फक्त दुसरा काही पर्याय नाही म्हणून?
त्याला किती संपर्क करण्याचा प्रयत्न केला, माझं लग्न ठरतंय हे सांगण्याचा देखील. पण तिकडून प्रतिसाद शून्य!
त्याचा काहीतरी घरात प्रॉब्लेम झालाय म्हणतो, आधी बहिणीचं लग्न व्हायला पाहिजे वगैरे. पण मी किती दिवस थांबणार अजून.

चार वर्षं झाली असतील आमच्या ओळखीला. सोशल साईट वरून भेटलो होतो आम्ही. दोघेही आपापल्या धर्माच्या बाबतीत कट्टर. आमच्यात प्रेम वगैरे काही होऊच शकत नाही, लग्न तर मुळीच नाही अशी खात्री असल्यानेच एकमेकांच्या जवळ आलेलो कदाचित.

मी जगाच्या दृष्टीने एक हुशार आणि सालस मुलगी. प्रेमविवाह ही करणार नाही अशी. तोदेखील त्याच्या घरी असाच नाकासमोर चालणारा म्हणून ओळखला जाणारा. नाही म्हणायला एव्हाना आम्हाला एकमेकांच्या धार्मिक भावनांबद्दल आदर वाटू लागलेला. पण एकमेकांच्या धर्माबद्दल नक्कीच नाही. लग्नानंतर मला धर्मांतर करावं लागेल हे त्याने त्याच्यात खूप गुंतल्यावर आडून सांगितलेलं आठवतंय मला. पण माझाही त्याला ठाम नकार. 

कदाचित म्हणूनच त्याने माझ्याशी संपर्क कमी केला असेल का? माहिती नाही. पण मला कितीही टाळत असला तरी त्यालाही माझ्याबद्दल खूप वाटतं हे कळत होतं मला. मी मुंबईत तर तो हैदराबादला. एकमेकांना आतापर्यंत फक्त तीन वेळा भेटलेलो. आमचे फोन एकमेकांशी बोलायचे बंद झाले, तरी मनं नक्कीच बोलत होती. आणि म्हणूनच मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हते.

पहिल्यांदा त्याचा फेसबुकवर आलेला मेसेज अजूनही आठवतोय. तुला शिवसेना  का आवडते? आणि माझा त्याला प्रश्न, तुम्हाला वंदे मातरम म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? इतके टोकाचे विचार असून आम्ही कसे जवळ आलो असू एकमेकांच्या? कितीतरी विषयांवर वाद घातलेला आठवतोय. शिवाजीमहाराज, औरंगजेब, बाळासाहेब, संघ, भाजपा, काँग्रेस, मूर्तिपूजा, शाकाहार अरे बापरे फारच मोठी यादी आहे अजून!

तो औरंगजेबाचं समर्थन करतो हे पाहून मी फार अस्वस्थ झाले होते. मला त्याचे विचार असे का आहेत या गोष्टीचा जितका त्रास होत होता तितकाच त्याच्याशी वाद घातल्याचाही होत होता. पण स्त्री-मन, नंतर मीच स्वत:हून बोलले त्याच्याशी, तेही अनेक मिनतवाऱ्या करून, पण तो म्हणाला कोणीतरी पाहुणे आले म्हणून मेसेज करायला वेळ मिळाला नाही, तो चिडला वगैरे नव्हता माझ्यावर. काश तेव्हा बोलले नसते, आणि नंतर परत कधीच बोलले नसते!

खूप त्रास व्हायचा मला, याला का समजत नाही मी सांगते ते, आणि त्यालाही होत असेल कदाचित की हिला का समजत नाही मी सांगतो ते! दोघांपैकी एक जरी वाकणारा असता तर कदाचित एक होऊ शकलो असतो आम्ही! पण मी त्याचं ऐकलं असतं तर मला जमलं असतं त्यांच्यातल्या वातावरणात रहायला? नक्कीच नाही. तसंही त्यांच्या इथल्या ब्राह्मणांना फार नावं ठेवायचा तो, आणि तो सांगतो तसं आमच्या सात पिढ्यात कोणाशी वागलं नसल्याने मला त्यातलं काही खरं वाटायचं नाही.

बरंच साम्यही होतं आमच्यात! तोही कट्टर, मी ही कट्टर! तोही कुटुंबवत्सल आणि मीही! त्याला लहान मुलं आवडत आणि मलाही! त्याला वाचन आवडत होतं आणि मलाही! त्याला पुरोगामी होणं आवडत नव्हतं आणि मलाही! हल्ली त्यांच्या कोणाला धर्म म्हणजे नक्की काय ते कळतच नाही आणि सगळे भलत्याच मार्गाला लागले आहेत असं त्यालाही वाटायचं त्यांच्याबद्दल आणि मलाहीआमच्याबद्दल! तो म्हणायचा, काश तुझ्यासारख्या धर्माभिमानी मुली आमच्यात असत्या, आणि मलाही आमच्यातल्या मुलांबद्दल असंच वाटायचं!

पण माणूस म्हणून तो खरंच श्रेष्ठ आहे यात काहीच वाद नाही. त्याने शक्य असूनही कधीच माझा गैरफायदा घेतला नाही. मला अक्षरश: कधीच हातही लावला नाही. मुंबईला तो आला तेव्हा आम्ही कुठे भेटलो तर सिद्धिविनायक मंदिरात. मी मंदिरात येतो पण दर्शन करू शकणार नाही म्हणाला. तेव्हा विनायकाला मी बोलल्याचं आठवतंय, माझं लग्न याच्याशीच होऊ दे असं नाही मागणार मी, पण आमच्या या नात्याचा शेवट आमच्या दोघांसाठीही चांगला होईल असाच कर! आणि त्याने ते ऐकलंय.

विकास खरंच चांगला मुलगा आहे आणि घरच्यांना सगळ्यांना आवडलाय! पण मीदेखील लग्नाच्या दिवसापर्यंत प्रयत्न करीन मला तो घेऊन जाऊ शकतोय का हे पाहायचा. जरी तो माझा फोन उचलत नसला तरी, माझ्या मेसेजला उत्तर देत नसला तरी, माझ्या मेलला रिप्लाय देत नसला तरी, आणि ऑनलाईन यायचा बंद झाला असला तरी! शेवटी सिद्धिविनायकाची मर्जी!

भारत-इंग्लंड सामना


image courtesy: Internet

काल भारत-इंग्लंड सामना बघायला खूपच मजा आली.
इंग्लंड विरुद्ध खेळत असल्यावर नेहमी आपण जिंकावं असंच वाटतं. 
आधीपासूनच एकतर वाटत होतं की पुण्याचं मैदान आपल्याला लकी नाही. त्यात इंग्लंडचे ३५० रन्स झाल्यावर तर सगळ्या आशाच सोडून दिल्या.
श्रे आणि मी घराबाहेर पडलो. आठवड्याची काही कामं उरकून दीड-एक तासात परत आलो.
येऊन पाहतो तर भारताचे ८४ धावांवर ४ आउट! आणि सगळे दिग्गज बादच्या यादीत दिसत होते. 

तरीही सगळा धीर एकवटून पुन्हा टीव्ही पुढे बसलो आणि मॅच पाहायला नंतर खरंच मजा आली.
केदार जाधव खूपच छान खेळला. केवढा दमला होता बिचारा.
नंतर परिस्थिती आवाक्यात आल्यावर स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
त्याच प्रेक्षकांमध्ये कॅमेरा केदारच्या आईवर गेला.
त्या एकच प्रेक्षक अशा होत्या की ज्यांच्या चेहऱ्यावर सामन्यापेक्षा माझा मुलगा बरा आहे ना याची काळजी स्पष्ट दिसत होती.