Wednesday 1 March 2017

उपकार

"काय गं श्वेता, काय झालं? अशी रडतेस काय?, काय म्हणाले सर? काही वेडंवाकडं बोलले का?" प्रीतीने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली. आणि मी दाटलेल्या कंठाने काहीही बोलूच शकत नव्हते. शिकवणी ते बसस्टॊप पूर्ण दहा मिनिटांच्या रस्त्यात अखंड डोळे वाहत होते. आणि गोंधळलेली, घाबरलेली प्रीती, माझी जिवलग मैत्रीण मला सावरायचा प्रयत्न करत होती, तेही मी का रडतेय याची काहीच कल्पना नसताना!

"बाबा, या विषयाला कॉलेजमध्ये शिकवायला चांगले शिक्षक नाहीत, तसे ते कोणत्याच विषयाला नाहीत. पण या विषयाचं जरा अवघड आहे. आणि पुढे करिअरसाठीही हाच विषय पक्का होणं आवश्यक आहे." - मी.
"किती असेल फी?" बाबा जरा चिंतेतच म्हणाले.
"पहिले तीन दिवस शिकवणीला जाऊन बसायचं आणि शिकवलेलं आवडलं तर पुढे सगळी फी दोन टप्प्यात भरून शिकवणी चालू ठेवायची. आठ हजार रुपयांची व्यवस्था दहा दिवसांत होईल का? तीन आणि पाच असे करून?" मी जरा चाचरतंच विचारलं.

आपल्याला ही फी परवडणारी नाही हे आधीच ठाऊक होतं तरीही धीर करून बाबांना विचारलं.
"बघतो जमतंय का". बाबाही विचारात पडले.
"नसेल जमत तर काहीच हरकत नाही बाबा, मी प्रीतीकडून समजून घेईन सगळं, आणि तीही मला नाही म्हणणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळा अशी मदत केलीये तिने मला". बाबांना ओझं देऊन माझ्याच काळजावर धोंडा ठेवल्यासारखं वाटत होतं मला!
"जा बंड्या तू क्लासला, मी बघतो फीचं" बाबांनी माझं दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला.

मी त्याच दिवशी प्रीतीबरोबर पहिल्या दिवसाचा वर्ग पूर्ण केला. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या विषयासाठी शिकवणी लावणं अगदी आवश्यकच होतं. आणि जडेजा सर तिथले सर्वात उत्तम शिक्षक होते. ते अतिशय कमर्शियल म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या शिकवणीला सगळी श्रीमंतांचीच मुलं दिसायची नेहमी. त्यांची फी देखील तशीच जास्त होती.  सुरुवातीचे तीन हजार तीन दिवसांनी भरले. ४५ दिवसांचा कोर्स होता. पुढची रक्कम सात दिवसात भरणं आवश्यक होतं.

"श्वेता, आज तुझा फी भरण्याचा शेवटचा दिवस आहे ना?" बाबांनी मी आठवण न करताच विचारलं. मी हो म्हणाले.
"मी तुमच्या सरांना आज दुपारी येऊन भेटून जाईन" - बाबा
"म्हणजे तुम्ही दुपारी माझी फी भरणार का?" - मी
"हो, दुपारपर्यंत होईल काहीतरी."
खरंच पैशांची व्यवस्था झालीये, की बाबा मला उगीच धीर देत आहेत? माझं मलाच कळेना.

संध्याकाळी शिकवणीला जायला निघालो आणि प्रीतीने माझी अस्वस्थता ओळखली. तिच्यापासून काहीच लपून नव्हतं.
"श्वेता काळजी नको करूस, उद्यापासून तुला नाही जमलं तरी कॉलेजमध्ये अर्धा तास जास्त थांबून सरांनी शिकवलेलं मला समजेल तसं तुला सांगत जाईन मी, सरांसारखं नक्कीच जमणार नाही. पण तुझं तरी कमीत कमी नुकसान होईल गं." मी खरंच इतकी भाग्यवान होते, प्रीतीसारखी मला समजून घेणारी, माझ्यासाठी तळमळ असणारी मैत्रीण मला मिळाली होती. नाहीतर स्वत:च्या घरचं सगळं छान असेल तर इतरांच्या गरिबीची खिल्लीच उडवताना सगळे दिसतात हल्ली!

शिकवणी सुरु झाली, सरांनी फी शिल्लक असलेल्या मुलांची फी भरण्यासाठी नावं वाचायला घेतली. प्रत्येक नावागणिक पुढचं नाव माझंच असेल असं वाटत होतं, आणि कानांवर दुसरं नाव पडलं की यापुढचं तर नक्कीच असेल अशी खात्री वाटत होती. पण पूर्ण यादीत माझं नाव नव्हतं. प्रीती आणि मला दोघींनाही खूप आनंद झाला. त्या दिवशी वर्गात मी सगळ्यात जास्त उत्तरं दिली. वर्ग संपला आणि सगळे निघताना सरांचा आवाज आला,
"श्वेता, आप मुझे ऑफिस में मिलना". आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं. प्रीती म्हणाली,
"तू ये बोलून, मी वाट बघते बाहेर, नंतर एकत्रच जाऊया".

ऑफिसमध्ये जाऊन पोहोचले, मनात खूप धाकधुक होती की सरांना काय बोलायचं असेल. थोडा वेळ वाट पाहीली. तेवढ्यात सर आले आणि म्हणाले,
"तुझे बाबा भेटले मला, तुझ्या फीच्या अडचणीबद्दल सांगितलं. तू आजिबात काळजी करू नकोस, शिकवणीच्या शेवटच्या दिवशी तुला फी भरायला जमली तरी चालेल. आणि समजा तेव्हाही नाही जमलं, तर जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा तुझ्या पगारातून नंतर तू मला पैसे आणून दे." (ते हिंदीतच बोलत होते)
हे ऐकलं आणि त्यांचा चांगुलपणा पाहून मला दाटून आलं, त्याच दाटलेल्या आवाजात त्यांना फक्त धन्यवाद दिले, अजून जास्तीचं काही बोलताच आलं नाही मला. आणि ऑफिसमधून बाहेर पडल्याक्षणी डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं.

Friday 3 February 2017

धडा

आमची ओळख हॉस्टेलमध्ये पहिल्या दिवशी झाली. मला रूम मिळाली होती. मिळालेल्या रूममध्ये माझं सामान घेऊन मी नुकतीच पोहोचले होते. पाच मिनिटं झाली असतील आणि बाबांबरोबर एक गृहस्थ आणि त्यांच्यामागून एक मुलगी चालत येताना दिसले. ती माझी रूममेट होती. पहिल्या दिवशी रूमवर आम्ही दोघीच होतो. गप्पा मारता मारता आमच्यात लवकरच चांगली मैत्री झाली. नंतर रूममध्ये चार जणी झाल्या तरी हॉस्टेल ते घर हा प्रवासही एकत्रच असल्याने आमची जास्तच जवळीक झाली. ती मैत्रीण म्हणून खरंच खूप चांगली होती. नेहमी मदत करणारी! शिवाय एक वेगळाच आत्मविश्वास होता तिच्यात. तशी अभ्यासात मी तिच्यापेक्षा हुशार होते, पण कॉलेजात गेल्यावर अभ्यासच सर्व काही नसतो. वागणं, बोलणं, दिसणं या गोष्टीच जास्त परिणामकारक असतात. तिचा माझ्यावर पूर्ण प्रभाव पडला आणि मी ती म्हणेल तसं वागू लागले.

काही व्यक्तींशी तिचं फारसं पटत नसे. विशेषतः जे तिला डॉमिनेट करू पाहत असतील अशा लोकांशी. हॉस्टेलचे काही नियम होते आणि ते पाळले जातात की नाही हे पाहणं तिथल्या रेक्टरचं काम होतं. आता गावातलं कॉलेज असल्याने आणि रिझर्वेशन आणि वशिल्याने नेमणूक झाल्याने आमच्या रेक्टरचे काही स्वत:चेच नियम होते. जसं की त्या सकाळी कधीच वेळेत ऑफिसमध्ये यायच्या नाहीत इत्यादी. एकदा आम्हाला खरेदीला जाण्यासाठी गेटपास हवा होता आणि या बाई नेमक्या हजर नव्हत्या. त्या नियमाने वागत नाहीत म्हणून तिला त्यांचा राग यायचा आणि आम्हाला सूट देण्याच्या बाबतीत त्या होस्टेलचे सगळे नियम पाळत होत्या. त्यांच्या काही लाडक्या मुलींना महिन्यातून दोनपेक्षा जास्त गेटपास देणे असे प्रकार व्हायचे. ती मला प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल भडकावून लावायची.

वर्ष संपत आलं आणि आम्ही होस्टेलवर न राहता बाहेर रूम घेऊन राहू असं आमचं ठरलं. पुढच्या वर्षांना क्लासेस लावणं गरजेचं होतं आणि हॉस्टेलमध्ये राहून बाहेरचे क्लासेस अटेंड करणं शक्य नव्हतं. त्या वर्षाचा शेवटचा गेटपास आम्हाला हवा होता आणि रेक्टरची आणि आमची काहीतरी कुरबुर झाली. त्या भरात ती त्यांच्याबद्दल जे भडकवायची ते आठवून मी त्यांना बरंच काही बोलले. एरवी शांत असणारी मी अचानक असं काही बोलल्याने त्यांनाही वाईट वाटलं, पण परिणाम व्हायचा तो झाला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला खास आमच्या पालकांना यावं लागलं. अजूनही आपण काही चूक केलंय हे माझ्या गावी नव्हतं.

_____________________________________________

नंतर रूमवर राहू लागलो. फ्लॅटचे मालक आमच्याच जातीचे होते आणि चांगली माणसं होती ती. त्यांच्याकडे एक लहान मुलगी होती दोन वर्षांची तिचा मला आणि माझा तिला चांगलाच लळा लागला. काकूंना बाहेर काही काम असेल तर त्या तिला माझ्याकडे सोपवून जायच्या. त्या घरात नसतील आणि पाणी यायची वेळ असेल तर आम्ही त्यांचं पाणी भरून ठेवायचो. त्याही चांगलं काही खायला केलं की आम्हाला द्यायच्या, टीव्ही पाहायला बोलायावच्या. नंतर नंतर तर आम्ही आमची रूम सोडून त्यांच्याच घरी जास्त असायचो. त्यांच्या मोठ्या मुलाचा अभ्यास घेणे, त्याचे प्रोजेक्ट करून देणे ही कामंही मी करत होते. घरचे भेटायला आल्यावर त्या माझं खूप कौतुक करायच्या त्यांच्यासमोर.

त्यांचे काही नियम होते की इस्त्री वगैरे अशा गोष्टींसाठी लाईट जाळायची नाही. लाईट बिल ते स्वत: आणि आम्ही चार भाडेकरू असं वाटून घ्यायचो. आम्ही त्यांच्या समोरच राहत असल्याने आम्ही चोरून काही इलेक्ट्रिक वस्तू वापरणं शक्य नव्हतं. पण वरच्या मजल्यावरच्या मुली सगळ्या वस्तू वापरायच्या. हे आम्हाला बरंच उशिरा समजलं आणि तिची परत माझ्या मनावर कब्जा करायला सुरुवात झाली. आपण बिलात वाटा देतो आणि वरच्या मुलीच लाईट जाळतात. आपणही रात्री अभ्यास करायचा आणि जास्त वेळ लाईट जाळायची असं ठरलं. तेव्हा चूक-बरोबर काही कळायचं नाही मला. अजूनही कळतं का माहीत नाही, पण जुन्या चुका नक्कीच लक्षात आहेत.

कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होतं. हॉस्टेल सोडल्यापासून आम्ही गुण्या-गोविंदाने तिथे राहीलो होतो. आणि असंच एक दिवस रात्री उशिरा लाईट चालू असताना मालकांनी फटीतून पाहण्याच्या प्रयत्न केला आणि आम्हाला त्यांची चाहूल लागली. तिने आमच्यात बरीच बडबड केली, मुलींच्या रूममध्ये पुरुषाने असं चोरून पाहावं का वगैरे. तसं तिचं म्हणणं चूक नव्हतं पण ते तसे नाहीत हे आम्हाला माहीती होतं. आणि शेवटी त्या कारणाने आमचं घरमालकांशी भांडण झालं. तिने ठिणगी टाकली आणि मी आग पेटवण्याचं काम केलं. रागाच्या भरात जुनं सगळं वागणं विसरून त्यांना अद्वातद्वा बोलले. रेक्टरप्रमाणे त्यांनाही धक्का बसला. तिच्याबद्दल त्यांना फार काही वाटलं नसेल पण ज्याच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नसते त्याने ते केलं की जास्त वाईट वाटतं, त्यामुळे माझ्याशीच त्यांची जास्त अढी बसली. घरचे आम्हाला न्यायला आल्यावर त्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला पण मी बोललेच असं होते की त्याचा आता काही परिणाम होणार नव्हता. काकूंच्या पाया पडताना डोळ्यांत पाणी आलं. मला फार वाटत होतं, त्यांना कळावं की मी त्यांना जे बोलले ते खरं नव्हतं, आत्ता डोळ्यांत आलेलं पाणी खरं आहे. पण तसं काही झालं नाही.

_____________________________________________

ते गाव सोडलं, परत घरी आले, लवकरच चांगली नोकरी मिळाली. आणि योगायोगाने तीही काही वर्षांनी माझ्याच कंपनीत नोकरीला लागली. इथे माझं चांगलं रेप्युटेशन होतं. ती कामाच्या बाबतीत ठीकठाक होती. काही वर्षं तिनेही व्यवस्थित काम केलं. आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर होतो त्यामुळे कामाच्या बाबतीत फार संबंध यायचा नाही, शिवाय चांगली मैत्रीण एकाच कंपनीत त्यामुळे भावनिक आधार होता. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. एक दिवस आम्ही दोघी एकाच प्रोजेक्टवर आलो. मी तिला सिनियर होते आणि बॉसला माझ्या कामाची पद्धत आवडत होती, तर ती सामान्यच आहे असं वाटत होतं. इतके दिवस ती फार महत्त्वाच्या नसलेल्या प्रोजेक्टसवर काम करत असल्याने तिचं स्किल कोणाला कळण्याचा फार प्रश्न आला नव्हता. पण आता बॉस तिच्या कामावर फारसा खुश नव्हता.

बॉसने तिला २-३ वेळा मीटिंग्समध्ये तिच्या चुका दाखवून झाल्या ज्या तिच्या मते चुका नसून साध्याच गोष्टी होत्या आणि बॉस त्याचा उगीच इश्यू करत होता. पुन्हा आम्ही दोघी एकत्र असताना तिची बॉसबद्दल माझ्या मागे भुणभुण चालू झाली. मग ते माणूस म्हणूनच कसे चांगले नाहीत इथपर्यंत तिचं बोलून झालं. मी माझ्या परीने बॉससमोर तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करायचे पण बॉसने मला एक दिवस स्पष्ट सांगितलं की ती तुझी मैत्रीण आहे म्हणून तू तिची बाजू घेऊ नकोस. तिसऱ्यांदा पुन्हा तशीच परिस्थिती आली होती जी यापूर्वी दोनदा येऊन गेली. पण आता मला तिची बाजू घेऊन भांडणं शक्यच नव्हतं. एक चांगल्या पगाराचा आणि चांगलं रेप्युटेशन असलेला जॉब मी सोडूच शकत नव्हते. या जॉबवरच माझ्या कुटुंबाची गुजराण चालू होती. तिचा नवरा कमवायला भक्कम होता. ती घरी बसली असती तरी तिला काही फरक पडत नव्हता. माझा जॉब अशा कारणाने गेला तर मात्र मला दुसरी नोकरी मिळणंही कठीण होऊन बसलं असतं.

आणि पहिल्यांदा माझं मन शहाण्यासारखं वागलं. बॉसबरोबर तिला इश्यूज होते, मला नाही हे मी तिथे आधीपासून असल्याने मला कळालं होतं. हॉस्टेल आणि फ्लॅटवर आम्ही एकत्रच गेलेलो असल्याने मी तिथे तिच्या नजरेनेच सगळ्यांना बघत होते. पण इथे माझी आधीच सगळ्यांबद्दलची मतं तयार झालेली होती आणि ती चुकीची नाहीत याची मला खात्री होती. त्यामुळे तिने प्रयत्न करूनही मी बॉसबरोबर तिच्यासाठी मुळीच भांडले नाही. तिचा प्रश्न तिला एकटीलाच हाताळू दिला, आणि ती इथूनही भांडून निघून गेली. इथे कोणी तिच्याबद्दल चांगलं बोलत नाही आणि तिला दुसरी नोकरी मिळणं शक्य नाही.

तिच्या नवऱ्याचं त्याच्याच घरच्यांशी पटेनासं झालंय असं समजलं मध्यंतरी! आणि त्याचा स्रोत काय असावा याची कल्पनाही आली. पण ती माझी चांगली मैत्रीण आहे. मुद्दाम नसेल करत ती असं पण मला मात्र आयुष्यभराचा धडा मिळालाय! आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी कोणाच्या प्रभावाखाली येत नाही.

Wednesday 25 January 2017

कबुली

आधी ठरवलं होतं की समजा आपण ब्लॉग वगैरे तयार केला तर त्यावर रोज लिहियचं.
पण खरंच निवांत वेळ मिळाल्याशिवाय काही लिहिणं किती अवघड आहे हे चार दिवसातच समजलं.
इतके दिवस मी चांगले ब्लॉग्स नुसतेच वाचत होते आणि मनात यायचं हे लोक इतकं छान लिहू शकतात तर वारंवार का लिहीत नसावेत?
कोणाच्या ब्लॉगवर पूर्वी दर आठवड्याला अपडेट्स असायचे ते कोणाचे महिन्यावर तर कोणाचे वर्षावर गेलेले.
कोणाचा ब्लॉग २ वर्षांपूर्वी बंद पडलेला तर कोणाचा चार!
पण आता त्याचं उत्तर मिळालंय.
मला सहजच लिहायचं असूनही निवांत बसल्याशिवाय लिहावंसं वाटत नाही तर छान लिहिणाऱ्यांना तर अजून वातावरण निर्मिती लागत असेल ना!
डोक्यात दुसरेच काही विचार चालले असतील किंवा काही डेडलाईन असेल तर खरंच नाही जमत बुवा लिहायला.
आपली प्रांजळ कबुली!
आणि हो छान छान लिहिणाऱ्यांनी नक्की वेळात वेळ काढत जा!

Monday 23 January 2017

उपमा

एखाद्या गोष्टीला उपमा कशी देऊ नये हे कोणी श्रे कडूनच शिकावं!
काल मला म्हणाला, तुझी स्किन आज खूपच छान दिसतेय.
नवऱ्याने रंगरूपाची स्तुती केलेली कोणाला नाही आवडणार.
मीही एकदम खुश झाले.
थोडीशी लाजायला पण सुरुवात झाली होती.
तोही माझ्या चेहऱ्याकडेच पाहत होता.
मी अजूनच लाल झाले.
त्याने माझा चेहरा हातात घेतला.
तेवढ्यात हे पुढचं वाक्य बोलायची खरंच काही गरज होती का?
"अगदी गुळगुळीत दाढी केल्यावर दिसते ना तशी..."
@#$%^&

Friday 20 January 2017

निरंजन

इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन झाल्यानंतर घराला हातभार म्हणून एके ठिकाणी डेटाएंट्रीचं काम करत होते. छोटा ३BHK फ्लॅटच होता तो. माझा टायपिंग वगैरे काही कोर्स झाला नव्हता, पण घरासाठी इन्कम महत्त्वाचं होतं, त्यामुळे खोटंच सांगितलं की माझा ४० चा स्पीड आहे म्हणून. त्यांनी टेस्ट घेतली, पण बऱ्यापैकी फास्ट टाईप करू शकत असल्याने त्यांनी मला रुजू करून घेतलं. तिथे मी जॉईन झाल्याझाल्या आधी सुपरवाईझरच्या रूम मध्येच बसत असे. मी व्यवस्थित काम करतेय आणि सिन्सिअर आहे असं लक्षात आल्यावर माझी रवानगी दुसऱ्या रूममध्ये झाली. तिथे निरंजन पहिल्यांदा भेटला.

ज्या वेगळ्या रूममध्ये मला बसवलं होतं तिथे निरंजन आणि मी दोघेच बसायचो. याआधी मी कधी मुलांशी स्वतःहुन बोलले नव्हते. निरंजनशीदेखील नाही बोलले. मी आपली माझी रोजच्या गबाळ्या अवतारात येई, रेडिओ चालू असे, तो ऐकत ऐकत कीबोर्ड बडवत बसे. तो शेजारी आधी एकटाच काहीतरी बडबड बडबड करायचा, नंतर हळूहळू माझ्याशी बोलू लागला. अगदी चुणचुणीत होता तो. नंतर दिवसातून २-४ वाक्यांवरून गाडी कधी तासंतास गप्पांपर्यंत आली कळलंच नाही. मला नेहमी ओरडायचा की तू जास्त टार्गेट करून देतेस त्यामुळे इतरांनाही तेवढं काम करावं लागतंय, एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस. तो गप्पांमध्ये बोलता बोलता त्याला कशी जोडीदार हवी हे सांगायचा, त्यातलं बरंच वर्णन माझ्याशी जुळायचं. मी घरीही आईला सांगितलं होतंच त्याच्याबद्दल, म्हणजे माझ्या ऑफिसच्या गप्पांमध्ये त्याचं नाव असायचं.

खरंतर माझ्याशी कोणीतरी मुलगा स्वतःहुन बोलतोय ही भावनाच खूप सुखद होती. मी तेव्हा असेन वीसेक वर्षांची. दिसायला अजून बरी होते. तर हा निरंजन सोलापूर तालुक्यातल्या छोट्याशा गावातून आलेला मुलगा. शिक्षण मध्येच सोडलेलं पण हार्डवेअर चा कोर्स केलेला. पुण्यात एका आश्रमात राहत होता. अध्यात्माची त्याला आवड होती. निदान माझ्याशी बोलताना तरी तसं दाखवायचा. त्यांच्या आश्रमात कीर्तनादी कार्यक्रम चालायचे त्यातही भाग घ्यायचा. त्याने त्या आश्रमाच्या गुरूंची २-३ पुस्तकेही मला वाचायला दिली होती. आणि एव्हाना आमची चांगली मैत्री झाली होती. मी कविता करते, वहीवर सहज काही परिच्छेद खरडते हे आतापर्यंत त्याला समजलं होतं. आणि मीही निरंजनला वही वाचायला द्यायची म्हणून अजून हुरूप येऊन वहीत पुढची पानं पांढऱ्याची काळी करू लागले होते. आणि माझी वही आतापर्यंत त्याच्याकडे पोचलेली होती. 

ऑफिसमध्ये इतर मैत्रिणीदेखील होत्या, त्यात प्रीतमदेखील होती. ती स्वतः:च जरा ओव्हरच होती. एकदा निरंजन बाईक घेऊन आला आणि मला थोड्या अंतरावर सोडतो म्हणाला. मला काही वावगं वाटलं नाही. प्रीतमने मला त्याच्या बाईकवर पाहिलं, आणि दुसऱ्या दिवशी मला समजावून सांगू लागली की तो काही बरा मुलगा नाही. दारू पितो वगैरे. तसा तो बोलता बोलता म्हणायचा आज आम्ही मित्र बसणार, फुल कल्ला वगैरे, म्हणजे माझ्याशी नाही, पण ग्रुपमध्ये असलं बोलायचा, तर मला वाटायचं की तो मजेतच बोलतोय. आश्रमात राहणारा, घरच्यांचे संस्कार असलेला, जानवं घालणारा मुलगा नसेलच दारू पीत.

प्रीतम सांगत होती की तिच्याशीही तो खूप बोलायला जायचा, पण तिने कधी त्याला भाव दिला नव्हता. कारण तो कसा फालतू आहे हे तिला माहिती होतं, आणि याउलट प्रीतमची शाळेपासून बरोबरची मैत्रीण मला सांगायची प्रीतमच कशी फालतू आहे. तिची कशी आतापर्यंत ३-४ लफडी झालेली आहेत, घरी कशी सारखी बोलणी खाते. पण शिव्या मात्र होत्या त्याच्या तोंडी. एकदा सीपीयू मध्ये हात अडकल्यावर आईचा घो म्हणाला होता, आणि नंतर हाच शब्द काही वेळा ऐकला होता त्याच्या तोंडून. मला तर काही कळेनासंच झालं होतं. पण ही गुंतागुंत फार वाढली नाही.

एके दिवशी आम्ही सकाळी नेहमीच्या वेळेत ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसचं दार बंद दिसलं. खाली रखवालदाराला विचारलं, त्याने उद्या या म्हणून सांगितलं. असे ४-५ हेलपाटे झाले, तेव्हा एकदा ऑफिस उघडं दिसलं. आमचे २-३ महिन्यांचे पगार थकलेले होते. त्यातला एका महिन्याचा पगार आम्हाला त्या दिवशी मिळाला आणि कंपनी बंद पडलीये असं आम्हाला सांगण्यात आलं. उरलेला पगार बुडालाच. "एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस" आठवलं मला. आमचा संपर्क कमी झाला. तेव्हा आमच्याकडे मोबाईल्स नसल्याने माझाही त्याच्याकडे लँडलाईन नंबर होता आणि त्याचाही माझ्याकडे लँडलाईनच होता आश्रमाचा!

नंतर इंजिनिअरिंगचा निकाल लागून मला हवी तशी नोकरी मिळाली, आता असे टाईमपास जॉब्स करायची मला गरज नव्हती. निरंजनचा तर मला जवळजवळ विसरच पडला होता, आणि काही वर्षांनी एके दिवशी अचानक तो कुठून तरी सोशल साईटवर अवतरला, म्हणाला माझी वही त्याच्याकडे आहे ती त्याला परत करायचीये. आता आमच्याकडे मोबाईल्स होते. तो सारखं भेटण्याबद्दल बोलत होता आणि मी सारखं त्याला टाळत होते. आणि आतापर्यंत मी मुलांना ओळखू लागले होते. त्याला मला कशासाठी एकदा तरी भेटायचंय ते माहिती होतं मला. कदाचित त्याच्या घरी लग्नाचं बघत होते.

आता मी तेव्हा होते तशी नव्हते दिसत. कष्ट करून करून शरीर सुकलेलं होतं. चेहरा निस्तेज झाला होता, आणि आता मी त्याला आवडणार नाही याची खात्री होती, म्हणूनच मी ते टाळत होते. पण हे किती दिवस चालणार? एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू म्हटलं. ऑफिसमधून सुटून एके संध्याकाळी भेटले त्याला. माझी वही घेऊन आला होता तो. माझ्याकडे पाहिलं आणि ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस म्हणून खूप हळहळ व्यक्त केली. खरोखरच काळजीच्या स्वरात काळजी घे म्हणाला आणि वही देऊन निघून गेला. आता त्याचे फोन मेसेज काही येणार नाही हे माहिती होतं मला!

Wednesday 18 January 2017

न्यूनगंड

घरी आम्ही तिघी बहिणीच! लहान होते तेव्हा आईशी बोलताना जुजबी विचारपूस झाली की बऱ्याच बायका म्हणायच्या, मुलगा नाही तुम्हांला? अरेरे! आई त्यांना म्हणायची मला आजिबात वाईट वाटत नाही, माझ्या मुली मला मुलासारख्याच आहेत. तेव्हा आईचा अभिमान वाटायचा. आजी-आजोबा देखील नातू आणि नातींमध्ये भेदभाव करायचे नाहीत. शाळेतही शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये भेदभाव झाल्याचं आठवत नाही. त्यामुळे शालेय जीवन चालू होतं तोपर्यंत सगळं छान चाललं होतं. पहिल्या नंबरात नसले तरी थोडीफार बुद्धिमत्ता असल्याने अभ्यास, शाळा आणि आपण असं छानसं जग होतं.

शाळेत हुशार इयत्तेत असल्याने आमच्या वर्गात फालतूपणा कमीच होता. तरी आठवी-नववी नंतर अमक्याने तिला प्रपोज केलं, तिने त्याची तक्रार शिक्षकांकडे केली अशा गोष्टी कानावर पडू लागल्या. हे सगळे अभ्यासात लक्ष नसणाऱ्यांचे धंदे आहेत अशीच धारणा होती. पण अशा गोष्टी ऐकायला एकीकडे मजाही यायची. मी तर लांब केस, तेल लावून घट्ट दोन वेण्या अशी टिपिकल नॉन-फॅशनेबल मुलगी होते, आणि तोपर्यंत त्यात काही चुकीचंही वाटत नव्हतं.

नंतर अकरावी-बारावीला कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्या रंगीबेरंगी मुली दिसू लागल्या. थोडा टीव्हीचा मनावर परिणाम होऊ लागला होता. छान-छान कपडे घातलेल्या स्टायलिश मुली पाहिल्या की थोडा हेवा वाटू लागला होता. आमची प्रगती फक्त दोन वेण्यांवरून एक वेणी आणि शाळेच्या ड्रेस ऐवजी तीन वेगवेगळे पंजाबी ड्रेस इतकीच झाली होती. अर्थात आपल्याला यापेक्षा जास्त काही परवडणारंही नाही याची जाणीव होतीच. त्यामुळे तेव्हाही फक्त अभ्यास एके अभ्यासच चालू होतं. नंतर एका हुशार मुलीच्या मागे एक मुलगा लागला होता आणि ती त्याच्याबद्दल बोलत होती तेव्हा जाणवलं की आपण कोणाला आवडू शकत नाही का? पण त्यावर फार विचार करावा असं तोपर्यंत तरी काही नव्हतं.

इंजिनिअरिंगला शहराबाहेर ऍडमिशन मिळाली आणि पहिल्यांदा मी घर सोडून राहणार होते. सुदैवाने सगळ्या रूममेट्स चांगल्या मिळाल्या. आणि गावाकडे असलो, तरी शहरातल्या राहणीमानाचा काही परिणामच झालेला नसल्याने काहीच अडचण आली नाही. पण मुंबईची आहे हे सांगितल्यावर सगळ्यांना थोडं आश्चर्य मात्र वाटायचं. आणि लोकल कितीतरी मुली माझ्यापेक्षा स्मार्ट राहायच्या. घरी केस कापू का अशी दोन-तीनदा विचारणा करून झालेली आतापर्यंत, पण आईच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत नव्हती. इथेही कॉलेजमध्ये मी एक थोडीफार हुशार मुलगी म्हणूनच ओळखली जाऊ लागले होते. पण थेअरीमध्ये जास्त गुण मिळूनही वायवाज ना कमी गुण मिळायचे, आणि जे थेअरीत जेमतेम पास व्हायचे अशा लोकल आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना वायवा मध्ये पैकीच्या पैकी गुण असायचे. तेव्हा लक्षात नव्हतंच आलं हे, दुनियादारी थोडी समजायला लागली तेव्हा याही गोष्टी आठवल्या इतकंच!

कॉलेज पूर्ण केलं आणि डेव्हलपरचा जॉब मिळाला. नोकरीसाठी फार शोधाशोध करावी लागली नाही. नोकरीत स्वत:चं स्थान निर्माण करायलाही फार कष्ट पडले नाहीत. लाईफस्टाईल अजूनही होती तशीच होती. आधी अभ्यास हे एकमेव ध्येय होतं, आता पैसे कमावणे हे एकमेव ध्येय झालं. सुदैवाने ऑफिसमध्ये लाईफस्टाईल पेक्षा बुद्धिमत्तेची कदर करणारे सिनियर्स भेटल्याने काही अडचण आली नाही. हळूहळू पगार वाढत गेला. लग्नासाठी पुरेशी रक्कम जमा झाल्यावर मुलं बघायला सुरुवात केली, आणि सगळा प्रॉब्लेम सुरु झाला.

कितीही हुशार असली तरी हुशार न दिसणारी मुलगी कोणाला आवडेल? तेही आजकालच्या जमान्यात? बरीच मुलं मला पटायची नाहीत, आणि जी थोडीफार बरी वाटायची त्यांच्याकडून नकार यायचा. तसंही अगदीच काडीसारखा बांधा, उंची कमी, चेहऱ्यावर डाग, नाकीडोळीही साधारणच, एकही फीचर म्हणावं असं नाही, अशी मुलगी अरेंज मॅरेज मध्ये कोणाला आवडणार? थोड्याच दिवसात मुलं पाहणे हा फक्त सोपस्कार म्हणून उरला. मुलांना जेव्हा निर्णय घेण्यासाठी एकदा भेटून बोलायचं असतं, तेव्हा बोलायचं कमी आणि 'बघायचं' जास्त असतं. आणि मग सुरु झाला स्वत:बद्दल न्यूनगंड! एक स्त्री जशी असायला हवी तशी मी नाही याबद्दल प्रचंड न्यूनता!

Tuesday 17 January 2017

डेली सोप्स


मराठी डेली सोप्स वर बंदी आणावी असं का नाही वाटत कोणालाच?
कसलं लॉजिक सोडून दाखवतात सगळं.
हिंदीवाल्यांनी फार पूर्वीच लॉजिकशी फारकत घेतली, तेव्हा मराठीत थोडंफार बरं चाललं होतं, पिंपळपान, गंगाधर टिपरे वगैरे वगैरे.
पण हिंदीची नक्कल नाही केली तर आम्ही सृजनशील वगैरे नाही का म्हणवले जाणार? कशाला उगीच ते!

त्या म्हाळसा-बानू आणि देवांची कथा पार लव्हस्टोरी ट्रॅन्गल करून टाकलाय. त्या म्हाळसेला काही तिचं रहस्य समजायला तयार नाही, अरे हो समजलं तर मालिका नाही का संपून जायची!
तुझ्यात जीव मध्ये एक असुरी पात्र घुसडलंच आहे, आणि ती देखील स्त्रीच असायला हवी हा नियमही पाळलाय.

नवऱ्याची बायको तर खरंच एवढी बिनडोक आहे की तिची दयासुद्धा येत नाही. जरासुद्धा स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? तो नवरा एवढा हाडतूड करतोय आणि ही सगळं खापर त्या तिसऱ्याच पोरीवर फोडून मोकळी. तो गुरु काय तिसरीतला मुलगा आहे का त्याला कोणी फूस लावायला? त्याला धडा शिकवेन इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याकडे परत कशाला जायचंय हिला? आणि त्याला धडा शिकवण्याची तर कुठे बातच नाही, जी काही वाट लावणार ती त्या पोरीची लावणार आहे म्हणे!

खुलता कळी मध्ये तर रोज चोराच्या उलट्या बोंबाच पाहायला मिळतात. त्या मोनिकाने आक्रस्ताळेपणा सुरु केला की तिला कोणी झोपत का नाही, की तू लग्नाआधी शेण खाल्लंस म्हणून तुझ्यावर ही वेळ आलीये आणि आता ते भोग म्हणून? माझी आई तिची कोणीतरी पाहिजे होती. इथे आमची कितीवेळा काही चूक नसतानाही आम्हाला गप्प करते तर मोनिकाची काय हालत केली असती!

काही दिया परदेशी मध्येही सगळा आनंदी आनंदच आहे. कोणती सून निशाइतकी वाईट आणि सासू गौरीच्या आईइतकी चांगली असते का? चांगल्या आणि वाईट दोन्हीही गोष्टींचं टोकच दाखवतात अगदी! त्या गौरीची जाऊबाई जितकी माठ दाखवलीय तितकं खरंच कोणी असतं का? बाकी बनारसमधल्या घरगुती संस्कृतीबद्दल विशेष काही माहिती नाही, पण जितकं मालिकेत दाखवलंय तितकं जुनाट वातावरण अजूनही असेल का?

एवढं असूनही सासूबाई कशा रोज ७ ते ११ टीव्हीसमोर डिंक लावून चिटकल्यासारख्या बसतात याचंच आश्चर्य वाटतं. एखादा भाग बुडला तर दुसऱ्या दिवशी त्याचं रिपीट पाहतात म्हणजे पाहतातच! जणू काही त्यावर परीक्षाच द्यायचीये त्यांना! त्यांच्यामुळेच जेवण करताना आणि नंतरचं आवरताना या मालिका डोळ्यापुढून गेल्यात त्याचा मला इतका त्रास होतो तर लोकांमध्ये हे सगळं न चुकता पाहण्याचा पेशन्स कुठून येत असेल?
देवा, माझीही सहनशक्ती थोडी वाढव रे बाबा!

Monday 16 January 2017

तो


मी का हे लग्न करतेय?
फक्त दुसरा काही पर्याय नाही म्हणून?
त्याला किती संपर्क करण्याचा प्रयत्न केला, माझं लग्न ठरतंय हे सांगण्याचा देखील. पण तिकडून प्रतिसाद शून्य!
त्याचा काहीतरी घरात प्रॉब्लेम झालाय म्हणतो, आधी बहिणीचं लग्न व्हायला पाहिजे वगैरे. पण मी किती दिवस थांबणार अजून.

चार वर्षं झाली असतील आमच्या ओळखीला. सोशल साईट वरून भेटलो होतो आम्ही. दोघेही आपापल्या धर्माच्या बाबतीत कट्टर. आमच्यात प्रेम वगैरे काही होऊच शकत नाही, लग्न तर मुळीच नाही अशी खात्री असल्यानेच एकमेकांच्या जवळ आलेलो कदाचित.

मी जगाच्या दृष्टीने एक हुशार आणि सालस मुलगी. प्रेमविवाह ही करणार नाही अशी. तोदेखील त्याच्या घरी असाच नाकासमोर चालणारा म्हणून ओळखला जाणारा. नाही म्हणायला एव्हाना आम्हाला एकमेकांच्या धार्मिक भावनांबद्दल आदर वाटू लागलेला. पण एकमेकांच्या धर्माबद्दल नक्कीच नाही. लग्नानंतर मला धर्मांतर करावं लागेल हे त्याने त्याच्यात खूप गुंतल्यावर आडून सांगितलेलं आठवतंय मला. पण माझाही त्याला ठाम नकार. 

कदाचित म्हणूनच त्याने माझ्याशी संपर्क कमी केला असेल का? माहिती नाही. पण मला कितीही टाळत असला तरी त्यालाही माझ्याबद्दल खूप वाटतं हे कळत होतं मला. मी मुंबईत तर तो हैदराबादला. एकमेकांना आतापर्यंत फक्त तीन वेळा भेटलेलो. आमचे फोन एकमेकांशी बोलायचे बंद झाले, तरी मनं नक्कीच बोलत होती. आणि म्हणूनच मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हते.

पहिल्यांदा त्याचा फेसबुकवर आलेला मेसेज अजूनही आठवतोय. तुला शिवसेना  का आवडते? आणि माझा त्याला प्रश्न, तुम्हाला वंदे मातरम म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? इतके टोकाचे विचार असून आम्ही कसे जवळ आलो असू एकमेकांच्या? कितीतरी विषयांवर वाद घातलेला आठवतोय. शिवाजीमहाराज, औरंगजेब, बाळासाहेब, संघ, भाजपा, काँग्रेस, मूर्तिपूजा, शाकाहार अरे बापरे फारच मोठी यादी आहे अजून!

तो औरंगजेबाचं समर्थन करतो हे पाहून मी फार अस्वस्थ झाले होते. मला त्याचे विचार असे का आहेत या गोष्टीचा जितका त्रास होत होता तितकाच त्याच्याशी वाद घातल्याचाही होत होता. पण स्त्री-मन, नंतर मीच स्वत:हून बोलले त्याच्याशी, तेही अनेक मिनतवाऱ्या करून, पण तो म्हणाला कोणीतरी पाहुणे आले म्हणून मेसेज करायला वेळ मिळाला नाही, तो चिडला वगैरे नव्हता माझ्यावर. काश तेव्हा बोलले नसते, आणि नंतर परत कधीच बोलले नसते!

खूप त्रास व्हायचा मला, याला का समजत नाही मी सांगते ते, आणि त्यालाही होत असेल कदाचित की हिला का समजत नाही मी सांगतो ते! दोघांपैकी एक जरी वाकणारा असता तर कदाचित एक होऊ शकलो असतो आम्ही! पण मी त्याचं ऐकलं असतं तर मला जमलं असतं त्यांच्यातल्या वातावरणात रहायला? नक्कीच नाही. तसंही त्यांच्या इथल्या ब्राह्मणांना फार नावं ठेवायचा तो, आणि तो सांगतो तसं आमच्या सात पिढ्यात कोणाशी वागलं नसल्याने मला त्यातलं काही खरं वाटायचं नाही.

बरंच साम्यही होतं आमच्यात! तोही कट्टर, मी ही कट्टर! तोही कुटुंबवत्सल आणि मीही! त्याला लहान मुलं आवडत आणि मलाही! त्याला वाचन आवडत होतं आणि मलाही! त्याला पुरोगामी होणं आवडत नव्हतं आणि मलाही! हल्ली त्यांच्या कोणाला धर्म म्हणजे नक्की काय ते कळतच नाही आणि सगळे भलत्याच मार्गाला लागले आहेत असं त्यालाही वाटायचं त्यांच्याबद्दल आणि मलाहीआमच्याबद्दल! तो म्हणायचा, काश तुझ्यासारख्या धर्माभिमानी मुली आमच्यात असत्या, आणि मलाही आमच्यातल्या मुलांबद्दल असंच वाटायचं!

पण माणूस म्हणून तो खरंच श्रेष्ठ आहे यात काहीच वाद नाही. त्याने शक्य असूनही कधीच माझा गैरफायदा घेतला नाही. मला अक्षरश: कधीच हातही लावला नाही. मुंबईला तो आला तेव्हा आम्ही कुठे भेटलो तर सिद्धिविनायक मंदिरात. मी मंदिरात येतो पण दर्शन करू शकणार नाही म्हणाला. तेव्हा विनायकाला मी बोलल्याचं आठवतंय, माझं लग्न याच्याशीच होऊ दे असं नाही मागणार मी, पण आमच्या या नात्याचा शेवट आमच्या दोघांसाठीही चांगला होईल असाच कर! आणि त्याने ते ऐकलंय.

विकास खरंच चांगला मुलगा आहे आणि घरच्यांना सगळ्यांना आवडलाय! पण मीदेखील लग्नाच्या दिवसापर्यंत प्रयत्न करीन मला तो घेऊन जाऊ शकतोय का हे पाहायचा. जरी तो माझा फोन उचलत नसला तरी, माझ्या मेसेजला उत्तर देत नसला तरी, माझ्या मेलला रिप्लाय देत नसला तरी, आणि ऑनलाईन यायचा बंद झाला असला तरी! शेवटी सिद्धिविनायकाची मर्जी!

भारत-इंग्लंड सामना


image courtesy: Internet

काल भारत-इंग्लंड सामना बघायला खूपच मजा आली.
इंग्लंड विरुद्ध खेळत असल्यावर नेहमी आपण जिंकावं असंच वाटतं. 
आधीपासूनच एकतर वाटत होतं की पुण्याचं मैदान आपल्याला लकी नाही. त्यात इंग्लंडचे ३५० रन्स झाल्यावर तर सगळ्या आशाच सोडून दिल्या.
श्रे आणि मी घराबाहेर पडलो. आठवड्याची काही कामं उरकून दीड-एक तासात परत आलो.
येऊन पाहतो तर भारताचे ८४ धावांवर ४ आउट! आणि सगळे दिग्गज बादच्या यादीत दिसत होते. 

तरीही सगळा धीर एकवटून पुन्हा टीव्ही पुढे बसलो आणि मॅच पाहायला नंतर खरंच मजा आली.
केदार जाधव खूपच छान खेळला. केवढा दमला होता बिचारा.
नंतर परिस्थिती आवाक्यात आल्यावर स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
त्याच प्रेक्षकांमध्ये कॅमेरा केदारच्या आईवर गेला.
त्या एकच प्रेक्षक अशा होत्या की ज्यांच्या चेहऱ्यावर सामन्यापेक्षा माझा मुलगा बरा आहे ना याची काळजी स्पष्ट दिसत होती.