Thursday, 25 January 2018

अस्वस्थ आणि अव्यक्त

नेहमी वाटतं, ज्यांच्यामध्ये काही ना काही कला असते ते लोक किती नशीबवान असतात. स्वत:च्या दु:खाला त्यांना वाट मोकळी करून देता येते, आनंद साजरा करता येतो. कोणी दर्दभऱ्या आवाजात गाऊ शकतो तर कोणी त्या दु:खाला कॅनव्हासवर उतरवून आणतो, कोणी श्रेष्ठ साहित्यकृती जन्माला घालतो तर कोणी एखादी सुरावट रचतो. पण माझ्यासारख्या सामान्य लोकांनी काय करावं?
 
ना मी गायक, ना कवी, ना चित्रकार, ना कथाकार, ना कीर्तनकार! कोणतीच कला अवगत नसेल तर व्यक्त व्हावं कसं? अस्वस्थतेला बाहेर काढावं कसं? असा खूप प्रश्न पडायचा आणि एक दिवस किशोर, जगजीत ऐकता ऐकता आपसूकच उत्तर सापडलं, हे लोक व्यक्त झाले आहेत ते आपल्यासाठीच तर झाले आहेत.
 
आपल्याला कलेतून व्यक्त होता येत नाही तर त्यांची कला फक्त अनुभवावी! जितकं ऐकता येईल तितकं ऐकावं, जितकं वाचता येईल तितकं वाचावं, जितकं रसग्रहण करता येईल तितकं करावं प्रत्येक गोष्टीचं, आनंदातही अन दुःखातही! कुठेना कुठे संदर्भ जुळत जातात आणि समाधान; शांतता मिळत जाते. 
 
कला म्हणजे देवत्वाचा अंशच! तो सगळ्यांनाच कसा मिळेल? भले देवाने आपल्याला कोणती कला दिली नसेल पण रसिकता तर दिलीये ना? प्रत्येक गोष्टीची अनुभूती घेता येते त्याबद्दलच तुझे आभार देवा, ज्यांना तू हेही दिलं नाहीस त्यांनी काय करावं?

Wednesday, 24 January 2018

अंतर

तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी.

आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य! 
अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा!

या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला!

रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा. बराच प्रयत्न करते मी माझी पावलं त्यात बसवून चालण्याचा!
पण दोन पावलातलं अंतर तुझ्यापेक्षा कमीच पडतं, आणि माझे पुन्हा प्रयत्न सुरु होतात तुझ्याशी समाजमान्य बरोबरी करण्याचे!

आज का आला नाहीस? काळजी? हुरहूर? नक्की काय? काहीच क्षण.... आणि छान वाटतंय आज कितीतरी युगांनी वाळूत तुझी पावलं येताना पाहताना!