आमची ओळख हॉस्टेलमध्ये पहिल्या दिवशी झाली. मला रूम मिळाली होती. मिळालेल्या रूममध्ये माझं सामान घेऊन मी नुकतीच पोहोचले होते. पाच मिनिटं झाली असतील आणि बाबांबरोबर एक गृहस्थ आणि त्यांच्यामागून एक मुलगी चालत येताना दिसले. ती माझी रूममेट होती. पहिल्या दिवशी रूमवर आम्ही दोघीच होतो. गप्पा मारता मारता आमच्यात लवकरच चांगली मैत्री झाली. नंतर रूममध्ये चार जणी झाल्या तरी हॉस्टेल ते घर हा प्रवासही एकत्रच असल्याने आमची जास्तच जवळीक झाली. ती मैत्रीण म्हणून खरंच खूप चांगली होती. नेहमी मदत करणारी! शिवाय एक वेगळाच आत्मविश्वास होता तिच्यात. तशी अभ्यासात मी तिच्यापेक्षा हुशार होते, पण कॉलेजात गेल्यावर अभ्यासच सर्व काही नसतो. वागणं, बोलणं, दिसणं या गोष्टीच जास्त परिणामकारक असतात. तिचा माझ्यावर पूर्ण प्रभाव पडला आणि मी ती म्हणेल तसं वागू लागले.
काही व्यक्तींशी तिचं फारसं पटत नसे. विशेषतः जे तिला डॉमिनेट करू पाहत असतील अशा लोकांशी. हॉस्टेलचे काही नियम होते आणि ते पाळले जातात की नाही हे पाहणं तिथल्या रेक्टरचं काम होतं. आता गावातलं कॉलेज असल्याने आणि रिझर्वेशन आणि वशिल्याने नेमणूक झाल्याने आमच्या रेक्टरचे काही स्वत:चेच नियम होते. जसं की त्या सकाळी कधीच वेळेत ऑफिसमध्ये यायच्या नाहीत इत्यादी. एकदा आम्हाला खरेदीला जाण्यासाठी गेटपास हवा होता आणि या बाई नेमक्या हजर नव्हत्या. त्या नियमाने वागत नाहीत म्हणून तिला त्यांचा राग यायचा आणि आम्हाला सूट देण्याच्या बाबतीत त्या होस्टेलचे सगळे नियम पाळत होत्या. त्यांच्या काही लाडक्या मुलींना महिन्यातून दोनपेक्षा जास्त गेटपास देणे असे प्रकार व्हायचे. ती मला प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल भडकावून लावायची.
वर्ष संपत आलं आणि आम्ही होस्टेलवर न राहता बाहेर रूम घेऊन राहू असं आमचं ठरलं. पुढच्या वर्षांना क्लासेस लावणं गरजेचं होतं आणि हॉस्टेलमध्ये राहून बाहेरचे क्लासेस अटेंड करणं शक्य नव्हतं. त्या वर्षाचा शेवटचा गेटपास आम्हाला हवा होता आणि रेक्टरची आणि आमची काहीतरी कुरबुर झाली. त्या भरात ती त्यांच्याबद्दल जे भडकवायची ते आठवून मी त्यांना बरंच काही बोलले. एरवी शांत असणारी मी अचानक असं काही बोलल्याने त्यांनाही वाईट वाटलं, पण परिणाम व्हायचा तो झाला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला खास आमच्या पालकांना यावं लागलं. अजूनही आपण काही चूक केलंय हे माझ्या गावी नव्हतं.
_____________________________________________
नंतर रूमवर राहू लागलो. फ्लॅटचे मालक आमच्याच जातीचे होते आणि चांगली माणसं होती ती. त्यांच्याकडे एक लहान मुलगी होती दोन वर्षांची तिचा मला आणि माझा तिला चांगलाच लळा लागला. काकूंना बाहेर काही काम असेल तर त्या तिला माझ्याकडे सोपवून जायच्या. त्या घरात नसतील आणि पाणी यायची वेळ असेल तर आम्ही त्यांचं पाणी भरून ठेवायचो. त्याही चांगलं काही खायला केलं की आम्हाला द्यायच्या, टीव्ही पाहायला बोलायावच्या. नंतर नंतर तर आम्ही आमची रूम सोडून त्यांच्याच घरी जास्त असायचो. त्यांच्या मोठ्या मुलाचा अभ्यास घेणे, त्याचे प्रोजेक्ट करून देणे ही कामंही मी करत होते. घरचे भेटायला आल्यावर त्या माझं खूप कौतुक करायच्या त्यांच्यासमोर.
त्यांचे काही नियम होते की इस्त्री वगैरे अशा गोष्टींसाठी लाईट जाळायची नाही. लाईट बिल ते स्वत: आणि आम्ही चार भाडेकरू असं वाटून घ्यायचो. आम्ही त्यांच्या समोरच राहत असल्याने आम्ही चोरून काही इलेक्ट्रिक वस्तू वापरणं शक्य नव्हतं. पण वरच्या मजल्यावरच्या मुली सगळ्या वस्तू वापरायच्या. हे आम्हाला बरंच उशिरा समजलं आणि तिची परत माझ्या मनावर कब्जा करायला सुरुवात झाली. आपण बिलात वाटा देतो आणि वरच्या मुलीच लाईट जाळतात. आपणही रात्री अभ्यास करायचा आणि जास्त वेळ लाईट जाळायची असं ठरलं. तेव्हा चूक-बरोबर काही कळायचं नाही मला. अजूनही कळतं का माहीत नाही, पण जुन्या चुका नक्कीच लक्षात आहेत.
कॉलेजचं ते शेवटचं वर्ष होतं. हॉस्टेल सोडल्यापासून आम्ही गुण्या-गोविंदाने तिथे राहीलो होतो. आणि असंच एक दिवस रात्री उशिरा लाईट चालू असताना मालकांनी फटीतून पाहण्याच्या प्रयत्न केला आणि आम्हाला त्यांची चाहूल लागली. तिने आमच्यात बरीच बडबड केली, मुलींच्या रूममध्ये पुरुषाने असं चोरून पाहावं का वगैरे. तसं तिचं म्हणणं चूक नव्हतं पण ते तसे नाहीत हे आम्हाला माहीती होतं. आणि शेवटी त्या कारणाने आमचं घरमालकांशी भांडण झालं. तिने ठिणगी टाकली आणि मी आग पेटवण्याचं काम केलं. रागाच्या भरात जुनं सगळं वागणं विसरून त्यांना अद्वातद्वा बोलले. रेक्टरप्रमाणे त्यांनाही धक्का बसला. तिच्याबद्दल त्यांना फार काही वाटलं नसेल पण ज्याच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नसते त्याने ते केलं की जास्त वाईट वाटतं, त्यामुळे माझ्याशीच त्यांची जास्त अढी बसली. घरचे आम्हाला न्यायला आल्यावर त्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला पण मी बोललेच असं होते की त्याचा आता काही परिणाम होणार नव्हता. काकूंच्या पाया पडताना डोळ्यांत पाणी आलं. मला फार वाटत होतं, त्यांना कळावं की मी त्यांना जे बोलले ते खरं नव्हतं, आत्ता डोळ्यांत आलेलं पाणी खरं आहे. पण तसं काही झालं नाही.
_____________________________________________
ते गाव सोडलं, परत घरी आले, लवकरच चांगली नोकरी मिळाली. आणि योगायोगाने तीही काही वर्षांनी माझ्याच कंपनीत नोकरीला लागली. इथे माझं चांगलं रेप्युटेशन होतं. ती कामाच्या बाबतीत ठीकठाक होती. काही वर्षं तिनेही व्यवस्थित काम केलं. आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर होतो त्यामुळे कामाच्या बाबतीत फार संबंध यायचा नाही, शिवाय चांगली मैत्रीण एकाच कंपनीत त्यामुळे भावनिक आधार होता. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. एक दिवस आम्ही दोघी एकाच प्रोजेक्टवर आलो. मी तिला सिनियर होते आणि बॉसला माझ्या कामाची पद्धत आवडत होती, तर ती सामान्यच आहे असं वाटत होतं. इतके दिवस ती फार महत्त्वाच्या नसलेल्या प्रोजेक्टसवर काम करत असल्याने तिचं स्किल कोणाला कळण्याचा फार प्रश्न आला नव्हता. पण आता बॉस तिच्या कामावर फारसा खुश नव्हता.
बॉसने तिला २-३ वेळा मीटिंग्समध्ये तिच्या चुका दाखवून झाल्या ज्या तिच्या मते चुका नसून साध्याच गोष्टी होत्या आणि बॉस त्याचा उगीच इश्यू करत होता. पुन्हा आम्ही दोघी एकत्र असताना तिची बॉसबद्दल माझ्या मागे भुणभुण चालू झाली. मग ते माणूस म्हणूनच कसे चांगले नाहीत इथपर्यंत तिचं बोलून झालं. मी माझ्या परीने बॉससमोर तिची बाजू घेण्याचा प्रयत्न करायचे पण बॉसने मला एक दिवस स्पष्ट सांगितलं की ती तुझी मैत्रीण आहे म्हणून तू तिची बाजू घेऊ नकोस. तिसऱ्यांदा पुन्हा तशीच परिस्थिती आली होती जी यापूर्वी दोनदा येऊन गेली. पण आता मला तिची बाजू घेऊन भांडणं शक्यच नव्हतं. एक चांगल्या पगाराचा आणि चांगलं रेप्युटेशन असलेला जॉब मी सोडूच शकत नव्हते. या जॉबवरच माझ्या कुटुंबाची गुजराण चालू होती. तिचा नवरा कमवायला भक्कम होता. ती घरी बसली असती तरी तिला काही फरक पडत नव्हता. माझा जॉब अशा कारणाने गेला तर मात्र मला दुसरी नोकरी मिळणंही कठीण होऊन बसलं असतं.
आणि पहिल्यांदा माझं मन शहाण्यासारखं वागलं. बॉसबरोबर तिला इश्यूज होते, मला नाही हे मी तिथे आधीपासून असल्याने मला कळालं होतं. हॉस्टेल आणि फ्लॅटवर आम्ही एकत्रच गेलेलो असल्याने मी तिथे तिच्या नजरेनेच सगळ्यांना बघत होते. पण इथे माझी आधीच सगळ्यांबद्दलची मतं तयार झालेली होती आणि ती चुकीची नाहीत याची मला खात्री होती. त्यामुळे तिने प्रयत्न करूनही मी बॉसबरोबर तिच्यासाठी मुळीच भांडले नाही. तिचा प्रश्न तिला एकटीलाच हाताळू दिला, आणि ती इथूनही भांडून निघून गेली. इथे कोणी तिच्याबद्दल चांगलं बोलत नाही आणि तिला दुसरी नोकरी मिळणं शक्य नाही.
तिच्या नवऱ्याचं त्याच्याच घरच्यांशी पटेनासं झालंय असं समजलं मध्यंतरी! आणि त्याचा स्रोत काय असावा याची कल्पनाही आली. पण ती माझी चांगली मैत्रीण आहे. मुद्दाम नसेल करत ती असं पण मला मात्र आयुष्यभराचा धडा मिळालाय! आता कोणी कितीही प्रयत्न केला तरी मी कोणाच्या प्रभावाखाली येत नाही.
No comments:
Post a Comment