Monday, 16 January 2017

तो


मी का हे लग्न करतेय?
फक्त दुसरा काही पर्याय नाही म्हणून?
त्याला किती संपर्क करण्याचा प्रयत्न केला, माझं लग्न ठरतंय हे सांगण्याचा देखील. पण तिकडून प्रतिसाद शून्य!
त्याचा काहीतरी घरात प्रॉब्लेम झालाय म्हणतो, आधी बहिणीचं लग्न व्हायला पाहिजे वगैरे. पण मी किती दिवस थांबणार अजून.

चार वर्षं झाली असतील आमच्या ओळखीला. सोशल साईट वरून भेटलो होतो आम्ही. दोघेही आपापल्या धर्माच्या बाबतीत कट्टर. आमच्यात प्रेम वगैरे काही होऊच शकत नाही, लग्न तर मुळीच नाही अशी खात्री असल्यानेच एकमेकांच्या जवळ आलेलो कदाचित.

मी जगाच्या दृष्टीने एक हुशार आणि सालस मुलगी. प्रेमविवाह ही करणार नाही अशी. तोदेखील त्याच्या घरी असाच नाकासमोर चालणारा म्हणून ओळखला जाणारा. नाही म्हणायला एव्हाना आम्हाला एकमेकांच्या धार्मिक भावनांबद्दल आदर वाटू लागलेला. पण एकमेकांच्या धर्माबद्दल नक्कीच नाही. लग्नानंतर मला धर्मांतर करावं लागेल हे त्याने त्याच्यात खूप गुंतल्यावर आडून सांगितलेलं आठवतंय मला. पण माझाही त्याला ठाम नकार. 

कदाचित म्हणूनच त्याने माझ्याशी संपर्क कमी केला असेल का? माहिती नाही. पण मला कितीही टाळत असला तरी त्यालाही माझ्याबद्दल खूप वाटतं हे कळत होतं मला. मी मुंबईत तर तो हैदराबादला. एकमेकांना आतापर्यंत फक्त तीन वेळा भेटलेलो. आमचे फोन एकमेकांशी बोलायचे बंद झाले, तरी मनं नक्कीच बोलत होती. आणि म्हणूनच मी दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नव्हते.

पहिल्यांदा त्याचा फेसबुकवर आलेला मेसेज अजूनही आठवतोय. तुला शिवसेना  का आवडते? आणि माझा त्याला प्रश्न, तुम्हाला वंदे मातरम म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? इतके टोकाचे विचार असून आम्ही कसे जवळ आलो असू एकमेकांच्या? कितीतरी विषयांवर वाद घातलेला आठवतोय. शिवाजीमहाराज, औरंगजेब, बाळासाहेब, संघ, भाजपा, काँग्रेस, मूर्तिपूजा, शाकाहार अरे बापरे फारच मोठी यादी आहे अजून!

तो औरंगजेबाचं समर्थन करतो हे पाहून मी फार अस्वस्थ झाले होते. मला त्याचे विचार असे का आहेत या गोष्टीचा जितका त्रास होत होता तितकाच त्याच्याशी वाद घातल्याचाही होत होता. पण स्त्री-मन, नंतर मीच स्वत:हून बोलले त्याच्याशी, तेही अनेक मिनतवाऱ्या करून, पण तो म्हणाला कोणीतरी पाहुणे आले म्हणून मेसेज करायला वेळ मिळाला नाही, तो चिडला वगैरे नव्हता माझ्यावर. काश तेव्हा बोलले नसते, आणि नंतर परत कधीच बोलले नसते!

खूप त्रास व्हायचा मला, याला का समजत नाही मी सांगते ते, आणि त्यालाही होत असेल कदाचित की हिला का समजत नाही मी सांगतो ते! दोघांपैकी एक जरी वाकणारा असता तर कदाचित एक होऊ शकलो असतो आम्ही! पण मी त्याचं ऐकलं असतं तर मला जमलं असतं त्यांच्यातल्या वातावरणात रहायला? नक्कीच नाही. तसंही त्यांच्या इथल्या ब्राह्मणांना फार नावं ठेवायचा तो, आणि तो सांगतो तसं आमच्या सात पिढ्यात कोणाशी वागलं नसल्याने मला त्यातलं काही खरं वाटायचं नाही.

बरंच साम्यही होतं आमच्यात! तोही कट्टर, मी ही कट्टर! तोही कुटुंबवत्सल आणि मीही! त्याला लहान मुलं आवडत आणि मलाही! त्याला वाचन आवडत होतं आणि मलाही! त्याला पुरोगामी होणं आवडत नव्हतं आणि मलाही! हल्ली त्यांच्या कोणाला धर्म म्हणजे नक्की काय ते कळतच नाही आणि सगळे भलत्याच मार्गाला लागले आहेत असं त्यालाही वाटायचं त्यांच्याबद्दल आणि मलाहीआमच्याबद्दल! तो म्हणायचा, काश तुझ्यासारख्या धर्माभिमानी मुली आमच्यात असत्या, आणि मलाही आमच्यातल्या मुलांबद्दल असंच वाटायचं!

पण माणूस म्हणून तो खरंच श्रेष्ठ आहे यात काहीच वाद नाही. त्याने शक्य असूनही कधीच माझा गैरफायदा घेतला नाही. मला अक्षरश: कधीच हातही लावला नाही. मुंबईला तो आला तेव्हा आम्ही कुठे भेटलो तर सिद्धिविनायक मंदिरात. मी मंदिरात येतो पण दर्शन करू शकणार नाही म्हणाला. तेव्हा विनायकाला मी बोलल्याचं आठवतंय, माझं लग्न याच्याशीच होऊ दे असं नाही मागणार मी, पण आमच्या या नात्याचा शेवट आमच्या दोघांसाठीही चांगला होईल असाच कर! आणि त्याने ते ऐकलंय.

विकास खरंच चांगला मुलगा आहे आणि घरच्यांना सगळ्यांना आवडलाय! पण मीदेखील लग्नाच्या दिवसापर्यंत प्रयत्न करीन मला तो घेऊन जाऊ शकतोय का हे पाहायचा. जरी तो माझा फोन उचलत नसला तरी, माझ्या मेसेजला उत्तर देत नसला तरी, माझ्या मेलला रिप्लाय देत नसला तरी, आणि ऑनलाईन यायचा बंद झाला असला तरी! शेवटी सिद्धिविनायकाची मर्जी!

No comments:

Post a Comment