Wednesday 18 January 2017

न्यूनगंड

घरी आम्ही तिघी बहिणीच! लहान होते तेव्हा आईशी बोलताना जुजबी विचारपूस झाली की बऱ्याच बायका म्हणायच्या, मुलगा नाही तुम्हांला? अरेरे! आई त्यांना म्हणायची मला आजिबात वाईट वाटत नाही, माझ्या मुली मला मुलासारख्याच आहेत. तेव्हा आईचा अभिमान वाटायचा. आजी-आजोबा देखील नातू आणि नातींमध्ये भेदभाव करायचे नाहीत. शाळेतही शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये भेदभाव झाल्याचं आठवत नाही. त्यामुळे शालेय जीवन चालू होतं तोपर्यंत सगळं छान चाललं होतं. पहिल्या नंबरात नसले तरी थोडीफार बुद्धिमत्ता असल्याने अभ्यास, शाळा आणि आपण असं छानसं जग होतं.

शाळेत हुशार इयत्तेत असल्याने आमच्या वर्गात फालतूपणा कमीच होता. तरी आठवी-नववी नंतर अमक्याने तिला प्रपोज केलं, तिने त्याची तक्रार शिक्षकांकडे केली अशा गोष्टी कानावर पडू लागल्या. हे सगळे अभ्यासात लक्ष नसणाऱ्यांचे धंदे आहेत अशीच धारणा होती. पण अशा गोष्टी ऐकायला एकीकडे मजाही यायची. मी तर लांब केस, तेल लावून घट्ट दोन वेण्या अशी टिपिकल नॉन-फॅशनेबल मुलगी होते, आणि तोपर्यंत त्यात काही चुकीचंही वाटत नव्हतं.

नंतर अकरावी-बारावीला कॉलेजमध्ये गेल्यावर सगळ्या रंगीबेरंगी मुली दिसू लागल्या. थोडा टीव्हीचा मनावर परिणाम होऊ लागला होता. छान-छान कपडे घातलेल्या स्टायलिश मुली पाहिल्या की थोडा हेवा वाटू लागला होता. आमची प्रगती फक्त दोन वेण्यांवरून एक वेणी आणि शाळेच्या ड्रेस ऐवजी तीन वेगवेगळे पंजाबी ड्रेस इतकीच झाली होती. अर्थात आपल्याला यापेक्षा जास्त काही परवडणारंही नाही याची जाणीव होतीच. त्यामुळे तेव्हाही फक्त अभ्यास एके अभ्यासच चालू होतं. नंतर एका हुशार मुलीच्या मागे एक मुलगा लागला होता आणि ती त्याच्याबद्दल बोलत होती तेव्हा जाणवलं की आपण कोणाला आवडू शकत नाही का? पण त्यावर फार विचार करावा असं तोपर्यंत तरी काही नव्हतं.

इंजिनिअरिंगला शहराबाहेर ऍडमिशन मिळाली आणि पहिल्यांदा मी घर सोडून राहणार होते. सुदैवाने सगळ्या रूममेट्स चांगल्या मिळाल्या. आणि गावाकडे असलो, तरी शहरातल्या राहणीमानाचा काही परिणामच झालेला नसल्याने काहीच अडचण आली नाही. पण मुंबईची आहे हे सांगितल्यावर सगळ्यांना थोडं आश्चर्य मात्र वाटायचं. आणि लोकल कितीतरी मुली माझ्यापेक्षा स्मार्ट राहायच्या. घरी केस कापू का अशी दोन-तीनदा विचारणा करून झालेली आतापर्यंत, पण आईच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मत नव्हती. इथेही कॉलेजमध्ये मी एक थोडीफार हुशार मुलगी म्हणूनच ओळखली जाऊ लागले होते. पण थेअरीमध्ये जास्त गुण मिळूनही वायवाज ना कमी गुण मिळायचे, आणि जे थेअरीत जेमतेम पास व्हायचे अशा लोकल आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना वायवा मध्ये पैकीच्या पैकी गुण असायचे. तेव्हा लक्षात नव्हतंच आलं हे, दुनियादारी थोडी समजायला लागली तेव्हा याही गोष्टी आठवल्या इतकंच!

कॉलेज पूर्ण केलं आणि डेव्हलपरचा जॉब मिळाला. नोकरीसाठी फार शोधाशोध करावी लागली नाही. नोकरीत स्वत:चं स्थान निर्माण करायलाही फार कष्ट पडले नाहीत. लाईफस्टाईल अजूनही होती तशीच होती. आधी अभ्यास हे एकमेव ध्येय होतं, आता पैसे कमावणे हे एकमेव ध्येय झालं. सुदैवाने ऑफिसमध्ये लाईफस्टाईल पेक्षा बुद्धिमत्तेची कदर करणारे सिनियर्स भेटल्याने काही अडचण आली नाही. हळूहळू पगार वाढत गेला. लग्नासाठी पुरेशी रक्कम जमा झाल्यावर मुलं बघायला सुरुवात केली, आणि सगळा प्रॉब्लेम सुरु झाला.

कितीही हुशार असली तरी हुशार न दिसणारी मुलगी कोणाला आवडेल? तेही आजकालच्या जमान्यात? बरीच मुलं मला पटायची नाहीत, आणि जी थोडीफार बरी वाटायची त्यांच्याकडून नकार यायचा. तसंही अगदीच काडीसारखा बांधा, उंची कमी, चेहऱ्यावर डाग, नाकीडोळीही साधारणच, एकही फीचर म्हणावं असं नाही, अशी मुलगी अरेंज मॅरेज मध्ये कोणाला आवडणार? थोड्याच दिवसात मुलं पाहणे हा फक्त सोपस्कार म्हणून उरला. मुलांना जेव्हा निर्णय घेण्यासाठी एकदा भेटून बोलायचं असतं, तेव्हा बोलायचं कमी आणि 'बघायचं' जास्त असतं. आणि मग सुरु झाला स्वत:बद्दल न्यूनगंड! एक स्त्री जशी असायला हवी तशी मी नाही याबद्दल प्रचंड न्यूनता!

No comments:

Post a Comment