इंजिनिअरिंगची परीक्षा देऊन झाल्यानंतर घराला हातभार म्हणून एके ठिकाणी डेटाएंट्रीचं काम करत होते. छोटा ३BHK फ्लॅटच होता तो. माझा टायपिंग वगैरे काही कोर्स झाला नव्हता, पण घरासाठी इन्कम महत्त्वाचं होतं, त्यामुळे खोटंच सांगितलं की माझा ४० चा स्पीड आहे म्हणून. त्यांनी टेस्ट घेतली, पण बऱ्यापैकी फास्ट टाईप करू शकत असल्याने त्यांनी मला रुजू करून घेतलं. तिथे मी जॉईन झाल्याझाल्या आधी सुपरवाईझरच्या रूम मध्येच बसत असे. मी व्यवस्थित काम करतेय आणि सिन्सिअर आहे असं लक्षात आल्यावर माझी रवानगी दुसऱ्या रूममध्ये झाली. तिथे निरंजन पहिल्यांदा भेटला.
ज्या वेगळ्या रूममध्ये मला बसवलं होतं तिथे निरंजन आणि मी दोघेच बसायचो. याआधी मी कधी मुलांशी स्वतःहुन बोलले नव्हते. निरंजनशीदेखील नाही बोलले. मी आपली माझी रोजच्या गबाळ्या अवतारात येई, रेडिओ चालू असे, तो ऐकत ऐकत कीबोर्ड बडवत बसे. तो शेजारी आधी एकटाच काहीतरी बडबड बडबड करायचा, नंतर हळूहळू माझ्याशी बोलू लागला. अगदी चुणचुणीत होता तो. नंतर दिवसातून २-४ वाक्यांवरून गाडी कधी तासंतास गप्पांपर्यंत आली कळलंच नाही. मला नेहमी ओरडायचा की तू जास्त टार्गेट करून देतेस त्यामुळे इतरांनाही तेवढं काम करावं लागतंय, एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस. तो गप्पांमध्ये बोलता बोलता त्याला कशी जोडीदार हवी हे सांगायचा, त्यातलं बरंच वर्णन माझ्याशी जुळायचं. मी घरीही आईला सांगितलं होतंच त्याच्याबद्दल, म्हणजे माझ्या ऑफिसच्या गप्पांमध्ये त्याचं नाव असायचं.
खरंतर माझ्याशी कोणीतरी मुलगा स्वतःहुन बोलतोय ही भावनाच खूप सुखद होती. मी तेव्हा असेन वीसेक वर्षांची. दिसायला अजून बरी होते. तर हा निरंजन सोलापूर तालुक्यातल्या छोट्याशा गावातून आलेला मुलगा. शिक्षण मध्येच सोडलेलं पण हार्डवेअर चा कोर्स केलेला. पुण्यात एका आश्रमात राहत होता. अध्यात्माची त्याला आवड होती. निदान माझ्याशी बोलताना तरी तसं दाखवायचा. त्यांच्या आश्रमात कीर्तनादी कार्यक्रम चालायचे त्यातही भाग घ्यायचा. त्याने त्या आश्रमाच्या गुरूंची २-३ पुस्तकेही मला वाचायला दिली होती. आणि एव्हाना आमची चांगली मैत्री झाली होती. मी कविता करते, वहीवर सहज काही परिच्छेद खरडते हे आतापर्यंत त्याला समजलं होतं. आणि मीही निरंजनला वही वाचायला द्यायची म्हणून अजून हुरूप येऊन वहीत पुढची पानं पांढऱ्याची काळी करू लागले होते. आणि माझी वही आतापर्यंत त्याच्याकडे पोचलेली होती.
ऑफिसमध्ये इतर मैत्रिणीदेखील होत्या, त्यात प्रीतमदेखील होती. ती स्वतः:च जरा ओव्हरच होती. एकदा निरंजन बाईक घेऊन आला आणि मला थोड्या अंतरावर सोडतो म्हणाला. मला काही वावगं वाटलं नाही. प्रीतमने मला त्याच्या बाईकवर पाहिलं, आणि दुसऱ्या दिवशी मला समजावून सांगू लागली की तो काही बरा मुलगा नाही. दारू पितो वगैरे. तसा तो बोलता बोलता म्हणायचा आज आम्ही मित्र बसणार, फुल कल्ला वगैरे, म्हणजे माझ्याशी नाही, पण ग्रुपमध्ये असलं बोलायचा, तर मला वाटायचं की तो मजेतच बोलतोय. आश्रमात राहणारा, घरच्यांचे संस्कार असलेला, जानवं घालणारा मुलगा नसेलच दारू पीत.
प्रीतम सांगत होती की तिच्याशीही तो खूप बोलायला जायचा, पण तिने कधी त्याला भाव दिला नव्हता. कारण तो कसा फालतू आहे हे तिला माहिती होतं, आणि याउलट प्रीतमची शाळेपासून बरोबरची मैत्रीण मला सांगायची प्रीतमच कशी फालतू आहे. तिची कशी आतापर्यंत ३-४ लफडी झालेली आहेत, घरी कशी सारखी बोलणी खाते. पण शिव्या मात्र होत्या त्याच्या तोंडी. एकदा सीपीयू मध्ये हात अडकल्यावर आईचा घो म्हणाला होता, आणि नंतर हाच शब्द काही वेळा ऐकला होता त्याच्या तोंडून. मला तर काही कळेनासंच झालं होतं. पण ही गुंतागुंत फार वाढली नाही.
एके दिवशी आम्ही सकाळी नेहमीच्या वेळेत ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसचं दार बंद दिसलं. खाली रखवालदाराला विचारलं, त्याने उद्या या म्हणून सांगितलं. असे ४-५ हेलपाटे झाले, तेव्हा एकदा ऑफिस उघडं दिसलं. आमचे २-३ महिन्यांचे पगार थकलेले होते. त्यातला एका महिन्याचा पगार आम्हाला त्या दिवशी मिळाला आणि कंपनी बंद पडलीये असं आम्हाला सांगण्यात आलं. उरलेला पगार बुडालाच. "एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस" आठवलं मला. आमचा संपर्क कमी झाला. तेव्हा आमच्याकडे मोबाईल्स नसल्याने माझाही त्याच्याकडे लँडलाईन नंबर होता आणि त्याचाही माझ्याकडे लँडलाईनच होता आश्रमाचा!
एके दिवशी आम्ही सकाळी नेहमीच्या वेळेत ऑफिसला पोहोचलो आणि ऑफिसचं दार बंद दिसलं. खाली रखवालदाराला विचारलं, त्याने उद्या या म्हणून सांगितलं. असे ४-५ हेलपाटे झाले, तेव्हा एकदा ऑफिस उघडं दिसलं. आमचे २-३ महिन्यांचे पगार थकलेले होते. त्यातला एका महिन्याचा पगार आम्हाला त्या दिवशी मिळाला आणि कंपनी बंद पडलीये असं आम्हाला सांगण्यात आलं. उरलेला पगार बुडालाच. "एवढं सिन्सिअरली कशाला काम करतेस" आठवलं मला. आमचा संपर्क कमी झाला. तेव्हा आमच्याकडे मोबाईल्स नसल्याने माझाही त्याच्याकडे लँडलाईन नंबर होता आणि त्याचाही माझ्याकडे लँडलाईनच होता आश्रमाचा!
नंतर इंजिनिअरिंगचा निकाल लागून मला हवी तशी नोकरी मिळाली, आता असे टाईमपास जॉब्स करायची मला गरज नव्हती. निरंजनचा तर मला जवळजवळ विसरच पडला होता, आणि काही वर्षांनी एके दिवशी अचानक तो कुठून तरी सोशल साईटवर अवतरला, म्हणाला माझी वही त्याच्याकडे आहे ती त्याला परत करायचीये. आता आमच्याकडे मोबाईल्स होते. तो सारखं भेटण्याबद्दल बोलत होता आणि मी सारखं त्याला टाळत होते. आणि आतापर्यंत मी मुलांना ओळखू लागले होते. त्याला मला कशासाठी एकदा तरी भेटायचंय ते माहिती होतं मला. कदाचित त्याच्या घरी लग्नाचं बघत होते.
आता मी तेव्हा होते तशी नव्हते दिसत. कष्ट करून करून शरीर सुकलेलं होतं. चेहरा निस्तेज झाला होता, आणि आता मी त्याला आवडणार नाही याची खात्री होती, म्हणूनच मी ते टाळत होते. पण हे किती दिवस चालणार? एकदाचा सोक्षमोक्ष लावूनच टाकू म्हटलं. ऑफिसमधून सुटून एके संध्याकाळी भेटले त्याला. माझी वही घेऊन आला होता तो. माझ्याकडे पाहिलं आणि ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस म्हणून खूप हळहळ व्यक्त केली. खरोखरच काळजीच्या स्वरात काळजी घे म्हणाला आणि वही देऊन निघून गेला. आता त्याचे फोन मेसेज काही येणार नाही हे माहिती होतं मला!
No comments:
Post a Comment